◾️ अनधिकृत उभारलेल्या मजल्यावरील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे केल्या विक्री
◾️रूपरजत नगरमध्ये भागीदार असलेल्या नॅशनल ज्वेलर्सचे मालक सागरमल जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकार झाला उघड
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: वास्तुविशारद यांच्या हुशारकीने मंजूर चटई क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम करणाऱ्या बोईसर येथील विकासकांने ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. एका बनावट कागदपत्र्याच्या आधारे विक्री केलेल्या सदनिका बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील तिसरा मजलाच अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या विकासकांवर आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रूपरजत नगर येथे महावीर इंटरप्रायसेस या भागीदार असलेल्या विकासकांने इमारतीचे बांधकाम केले आहे. याठिकाणी बांधकाम करताना मंजूर नकाशापेक्षा एक मजला अतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामाच्या सदनिकेची विक्री करताना रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले होते. यावरून शासकीय अधिकारी सदनिकेचे रजिस्ट्रेशन करताना बनावट कागदपत्रांच्या आधारावर नोंदणी करत असल्याचे देखील उघड झाले आहे. या संपूर्ण रूपरजत नगर मध्ये मंजूर चटई क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने भोगवटा दाखला कसा दिला हा प्रश्न निर्माण होतो. बोईसर मध्ये जिल्हा प्राधिकरण नावापुरते असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे फक्त सफाईदार पणे या अनधिकृत कामात आपले हात ओले करून अनधिकृत बांधकामाकाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
रूपरजत नगर येथील रूपराजत को ऑपरेटिव्ही सोसायटीमध्ये चिंचणीचे रहिवासी केतन राऊत यांनी पालघर नॅशनल ज्वेलर्सचे मालक व महाविर इंटरप्रायसेसचे भागीदार असलेले सागरमल जैन यांच्या कडून सदनिका खरेदी केली होती. मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत बांधकाम केलेली सदनिका फसवणूक करून विकल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील अधिक तपशील असा आहे की, 14 लाख 28 हजार रुपयांना 2018 मध्ये सदनिका विक्रत घेण्याचे ठरल्यानंतर केतन राऊत यांनी व्यवहारा पैकी 1 लाख 28 हजार रूपयांचा आगाऊ धनादेश सागरमल जैन यांच्या पत्नी लाडलीदेवी जैन यांच्या नावे देऊन उर्वरीत 12 लाख 90 हजार रुपये डीएचएफएल कडून घेतलेल्या गृहकर्जाच्या माध्यमातून दिले होते. कर्ज घेतलेल्या फायनान्स कंपनीचा व्याजदर जास्त असल्याने इतर बँकेत कर्ज स्थांनातरीत करण्यासाठी अर्ज केला असात बँकेने इमारतीचा आराखडा,बांधकाम परवानगी,इमारत पूर्णत्वाचा दाखला व ब्ल्युप्रिंट आदी कागदपत्रांची मागणी केली असता महाविर इंटरप्रायसेस कडून भागीदार सागरमल जैन यांने कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ केली. केतन राऊत यांनी पालघरच्या नगर रचना कार्यालयातून कागदपत्रे गोळा केल्यानंतर इमारतीमध्ये तिसरा मजला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
रूपरजत नगर मधील सदनिकेच्या बनावट कागदावर विकासकांने सदनिकेची विक्री करून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच. केतन राऊत यांनी बोईसर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर नॅशनल ज्वेलर्सचे मालक सागरमल जैन,त्यांची पत्नी लाडलीदेवी जैन आणि मुलगा विपुल जैन यांच्याविरोधात कलम ४२०,३४ आणि ५२ अन्वये 7 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच या इमारतीत आजून किती लोकांची फसवणूक झाली आहे याबाबत तक्रारी आल्यानंतर फसवणूकीची बाब समोर येईलच मात्र या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेले सर्व भागिदार, शासकीय अधिकारी, वास्तुविशारद असे अनेक मोकाट असून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.