◾️ कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न तर तीन आरोपी अटक 6 आरोपी फरार; नऊ गायींना वाचवण्यात यश
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गोहत्या तारापूर येथील मोहल्ला असलेल्या भागात केली जात असल्याने पोलिसांनी अनेकदा कारवाई करून देखील गोहत्येचे सत्र याठिकाणी सुरूच आहे. असाच प्रकार 26 जानेवारी रोजी पुन्हा उघडकीस आला असून दोन गायींची हत्या करताना आरोपीना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. यावेळी नऊ गायी आणि वासरांचा जीव वाचवण्यात यश आले असून कारवाईच्या वेळी आरोपीनी पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून यात तीन पोलीस जखमी झाले आहेत.
तारापूर परिसरात मोहल्ला असलेल्या भागात वारंवार होणाऱ्या गोहत्येच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ११.३० च्या सुमारास तारापूर येथे गोहत्या होणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या तबेल्यात धाड टाकली असता दोन गायींची कत्तल करताना आरोपी शोएब कौलारीकर आणि सुलेमान पटनी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पोलिसांच्या सोबत झालेल्या झटापटीचा फायदा घेत मोहम्मद जोहेब युसुफ शेख ऊर्फ सलमान, अन्सारी दमणवाला,अतिक अन्सारी,अब्दूल हमीद अन्सारी, मोहम्मद जोहर शेख,रुबिना शेख, खालिद,रमजान, फैजल,ठाकूर आणि इतर आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईत कत्तलीसाठी आणलेल्या आणखी नऊ गोवंशाना वाचवण्यात यश आले आहे.
गोहत्या करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर आरोपीनी त्यांच्या जवळ असणाऱ्या धारधार हत्यारानी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव,पोलीस हवालदार हाडळ आणि राठोड यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपींसोबत झालेल्या झटापटीत तीन पोलीस जखमी झाले. यावेळी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दोन आरोपीना पकडण्यात यश मिळवून आपल्या शौर्याचा परिचय करून दिला आहे. सर्व आरोपींवर कलम ३०७,३५३,३३२,२६९,४२९,३४,२५,५ अ,९ अ,३,११ आणि ४ अन्वये तारापूर पाचमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी राहुल संखे यांनी घटनास्थळावरून मांसाचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
◾️गोहत्येची बातमी पसरताच पाचमार्ग पोलीस ठाण्याच्या आवारात हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेत गोहत्येमध्ये सामील इतर सर्व आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.