चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.
एका महीलेचा मृत्यू
पालघर दर्पण : प्रतिनिधी
बोईसर: प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने प्रचंड गर्दी झालेल्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर कारने १२ पर्यटकांना चिरडल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. यामध्ये एका महीलेचा मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. इतर किरकोळ जखमी झालेल्यां मुली आणि महीलांना चिंचणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा योग साधत कुटुंबासहित पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या थेट समुद्रकिनाऱ्यावर नेत असतात. यामध्ये काही मद्यधुंद असलेले पर्यटक भरधाव वेगाने स्टंट करीत नेहमीच धोकादायक पद्धतीने इतर पर्यटकांच्या जीवाशी खेळत असतात.
अशाच एका घटनेत सचिन झोपे (वय ५८ वर्षे) यांनी आपल्या गाडीने किनार्यावर सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी आलेल्या पर्यटक आणि खाद्यपदार्थ विक्रते यांना चिरडले असून या धडकेत हेतन खातून (वय ६८) या महीला गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी बोईसर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर प्रियंका कोम (वय १८) या तरुणीच्या डोक्याला इजा झाल्याने तीला बोईसरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींमध्ये महरून्न्सा मंसूरी (वय १२)वैष्णवी काटकर (वय ११)आरोही दांडेकर (वय ७०)एंजल दांडेकर (वय ११)प्रियंका कोम (वय १८)ममता हाडळ (वय १२)खैतून मंसूरी (वय ७५)प्रीती हाडळ (वय ११)मेहरान (वय १२)मेहेक (वय १५)शौर्या (वय ६) महीला आणि लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर चिंचणी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
या अपघातात बीचवरील खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या हातगाड्या व खुर्च्या यांचेदेखील मोठे नुकसान केले आहे.अपघातास कारणीभूत कारचालका विरुद्ध वाणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी करत आहेत.