◾️ रेल्वेच्या भरावात चोरीचा मुरुम; स्वामित्वधन बनावट परवाना घेवून केली जात होती वाहतूक
◾️बोईसर मंडळ अधिकारी व त्याच्या टिमने केली कारवाई; स्वामित्वधनाचा परवाना देताना प्रांत अधिकारी कार्यालयाचा बेजबाबदार पणा उघड
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: रेल्वेच्या भरावासाठी वापरल्या जाणाऱ्या चोरट्या मुरुड उत्खनावर बोईसर मंडळ अधिकारी यांनी कारवाई केली असून काही वाहने जप्त करण्यात आली आहेत. पालघर प्रांत अधिकारी यांच्या कडून आदिवासी खातेदार असलेल्या जागेवर उत्खनासाठी नियमबाह्य परवानगी घेवून दुसऱ्या ठिकाणाहून मुरुमाचे खोदकाम सुरू होते. हा मुरुम वाणगाव डहाणू भागात रेल्वेच्या सुरू असलेल्या भरावाच्या कामात पाठवला जात होता. याबाबत माहिती मिळतात बोईसर महसूल विभागाने प्रत्येक्ष जागेवर धाड टाकून ही मोठी कारवाई केली आहे.
रेल्वे कॉरिडॉर च्या कामात मुरुम भरावाचा ठेका एनजी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने घेतला असून त्याकरिता मौजे राणीशिगाव येथील गट क्रमांक 54 या आदिवासी खातेदार जगन्नाथ चिंटू माळकरी यांच्या जागेतील मुरूम उत्खननाचा स्वामित्वधन परवाना घेतला होता. मात्र प्रत्यक्ष जागेवर उत्खनन न करताच त्या गावा पुढील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खानिवडे गावातील गट क्रमांक 60/1 प्रमोद चिखलीकर यांच्या मालकीच्या जागेतून जमीन मालकाच्या परवानगी ने चोरट्या पद्धतीने दहा ते पंधरा हायवा ट्रकने चोरटी वाहतूक रेल्वेच्या कामासाठी केली जात होती. मुरुम उत्खनन करण्यासाठी पोकलेन मशीनचा वापर करून गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कारवाईत महसूल विभागाचा बनावट पणा उघड झाला असून आदिवासी जागेवर स्वामित्वधन परवाना दिलाच कसा हा प्रश्न उपस्थित राहत आहे.
पालघर तालुक्यातील मौजे राणीशिगाव येथील आदिवासी खातेदार असलेल्या गट क्रमांक 54 या जागेवर मुरुम उत्खनाची बेकायदेशीर परवानगी प्रांत अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली होती. ही जागा आदिवासी खातेदारांची वर्ग दोनची असल्याचे समोर आले असून अशा जागेवर कोणत्या नियमानुसार उत्खनाची परवानगी दिली हा सवाल उपस्थित राहत आहे. सर्व सामान्य माणसाला उत्खनन परवानगी घेताना शेकडो नियम दाखवणारे महसूल विभाग कोणत्या अर्थकारणामुळे लाचार झाले या तपासाचा भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी परवानगी घेतली त्या कंपनीने खानिवडे गट क्रमांक 60/1 मध्ये उत्खनन करून वाहना सोबत वाहतूक करताना स्वामित्वधनाचा बनावट घेतलेला राणीशिगाव येथील गट क्रमांक 54 चा वापर केला जात होता. यामुळे महसूल विभागाची लक्तरे काढणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पालघर तालुक्यातील भुमाफिया आदिवासी जागेसह वनविभागाच्या जागेवर देखील खोदकाम करत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. काही भागात नियमबाह्य पणे कायदा धुडकावून परवानग्या पालघर तालुक्यात दिल्या जात असल्याचे राणीशिगाव येथील प्रकरणानंतर पुराव्यानिशी उघड झाले आहे. एखाद्या ठिकाणी स्वामित्वधन परवाना देताना त्याबाबत पालघर तहसीलदार कार्यालय व प्रांत अधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची प्रत्येक्षात जागेवर जावून पाहणी किंवा सत्यता पाहिली जात नाही. यातच परवानगी बाबत आदेश दिल्यानंतर याची कोणत्याही प्रकारची लेखी माहिती किंवा आदेशाची प्रत संबंधित मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना दिली जात नाही. यामुळे पालघर महसूल विभागाचे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल प्रत्येक वर्षी बुडवला जात असून याचा हिस्सा कोणाच्या खिशात जातो याचा तपास आता घेणे गरजेचे आहे.
◾️बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात केलेल्या खोदकामावर महसूल विभागाचे बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक व त्यांची सर्व टीम यांनी शुक्रवारी दहा वाजताच्या सुमारास खानीवडे येथे टाकलेल्या धाडीत सात हायवा ट्रक व एक पोकलेन जागेवर अनधिकृत रित्या उत्खनन करताना व वाहतूक करताना हायवा ट्रक आढळून आली होती. सदरची सात हायवा ट्रक बोईसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोकलेन ही मशिनरी खानिवडे गावच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक, तलाठी हितेश राऊत, संजय चुरी, रत्नदीप दळवी, सोपान पवार, अनंता पाटील यांनी केली असून पालघर तहसीलदार सुनिल शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
◾️ चोरट्या मुरुम भरावात विरारचा नाना?
रेल्वेच्या भरावाचे काही काम विरारच्या नानाचे असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. याच नानाच्या दबावाखाली शासकीय अधिकारी देखील नियमबाह्य उत्खनन परवानग्या देत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. राजकीय दबाव वापरून अशा प्रकारे शासनाचा महसूल बुडवून चोरट्या मुरुमाचे कामकाज चालवणाऱ्या कामात विरारचा नाना असल्याची चर्चा असल्याने पोलिसांना हा नाना कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे.