◾️मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकाकडे तलाठी व ग्रामपंचायचे दुर्लक्ष; आदिवासी जागेवर देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील पास्थळ येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असून महसूल विभागाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अशा अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायत कडून देखील घरपट्टी व इतर सुविधा देवुन संरक्षण मिळत असल्याने अनधिकृत बांधकाम करणारे याभागात तेजीत आहेत. यातच मुख्य रस्त्यालगत असलेल्या आदिवासी जागेवर देखील मोठ्या प्रमाणात गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र स्थानिक तलाठी यांनी अशा अनधिकृत बांधकामाकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
बोईसर प्रमाणेच आता पास्थळ भागात देखील अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहेत. याठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असताना देखील महसूल विभागाच्या तलाठ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहेत. पास्थळ येथे बोईसर तारापूर मुख्य रस्त्यालगत असलेल्या आदिवासी जागेची बेकायदेशीर पणे विक्री करून त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम गेल्या महिन्याभरापासुन सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी थोड्या अंतरावर देखील याअगोदर देखील आदिवासी जागेवर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असून याठिकाणी गोडाऊन उभारण्यात आली आहेत. असे असले तरी एखाद्या लहान बांधकाम सुरू असल्यावर त्याठिकाणी कारवाईचा धाक दाखवत आले आर्थिक गणित पुर्ण करणारे महसूल विभागाचे तलाठी मात्र याठिकाणी का दुर्लक्ष करतात हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे.
बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर एक्सेस एटीएमच्या बाजूला एका अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या बांधकामाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. काही जागृत नागरीकांनी बोईसर मंडळ अधिकारी यांना माहिती दिल्यानंतर साधारण दोन महिन्यापूर्वी येथील पदभार असलेले बोईसर तलाठी यांनी याठिकाणी असलेले बांधकाम दोन चार दिवस बंद ठेवले होते. मात्र नेमकी कोणत्या तडजोडी नंतर हे बांधकाम जोमाने सुरू होऊन पहिला मजला देखील उभारण्यात आला हा सवाल उपस्थित राहत आहे. पास्थळ भागातील एमएससीबी काँलनी समोर देखील एका पोलिस खात्यात असलेल्या इसमाने अनधिकृत इमारतीचे बांधकाम केले आहे. याठिकाणी बोईसर मंडळ अधिकारी यांनी कार्यालयाचे कर्मचारी नितीन धोडी यांना अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी पाठवले असता संबंधित पोलिसांने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला धमकावले असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला होता. मात्र तरीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस पकडणारे महसूल अधिकारी अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.
◾️ग्रामपंचायतीचे अनधिकृत बांधकामाला पाठबळ?
पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून अशा बांधकामावर आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. आदिवासी गावठाण व इतर गावठाण जागेवर देखील इमारती बेकायदेशीर पणे उभ्या असताना देखील अशा बांधकामाला घरपट्टी व इतर सुविधा देखील पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी पाठबळ देत असल्याचे दिसून येते.