◾️बनावट स्वामित्वधन परवाना वापरून मुरुम उत्खनन करणाऱ्यांना तहसीलदारांची साथ; वाहने सोडण्यासाठी तहसीलदारांचा खटाटोप
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यात एकदोन गौणखनीज वाहनांवर कारवाई करून इतर बड्या माफियांन कडे दुर्लक्ष करणाऱ्या पालघर तहसीलदार यांनी सुट्टीच्या दिवशी देखील मुरुम चोरांची वाहने सुटावित यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे थोडीफार सवलत देवून शासनाच्या तिजोरीत दंडाची रक्कम जमा झाल्याने तहसीलदार यांनी बजावलेले कर्तव्य वाखाणण्याजोगी आहे. बोईसर मंडळ अधिकारी यांनी केलेल्या मुरुम उत्खनन कारवाईत पकडण्यात आलेली वाहने तहसीलदार यांनी विशेष अधिकारांने दंड वसूल करून सोडून देत मुरुम चोरीचा प्रकार तडीस नेला आहे.
बोईसर मंडळ अधिकारी व त्यांच्या तलाठ्यांनी 28 जानेवारी 2022 रोजी शुक्रवारी दुपारच्या वेळी तलाठी सझा कुकडे यांच्या हद्दीत येणाऱ्या खानिवडे येथील गट क्रमांक 60/1 याठिकाणी बेकायदेशीर मुरुम खोदकाम सुरू असताना सात हायवा वाहनांवर कारवाई केली होती. यावेळी ताब्यात घेतलेली सर्व सात वाहने बोईसर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. याठिकाणी खोदकाम करण्यात येणारा मुरुम हा चोरट्या पध्दतीने रेल्वेच्या सुरू असलेल्या कामात वापरला जात होता. मंडळ अधिकारी यांनी कारवाई केल्यानंतर याची माहिती पालघर तहसीलदार यांना दिल्यानंतर काही वेळातच तहसीलदार सुनिल शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर फोटोशूट केल्यानंतर तहसीलदार याठिकाणाहुन निघून गेले. कुकडे तलाठी यांनी घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी यांच्या मार्फत तहसीलदार यांना त्यांच दिवशी सादर केल्याचे म्हटले आहे. शनिवारी 29 जानेवारी रोजी साधारण सायंकाळच्या वेळी पालघर तहसीलदार यांनी तातडीने दंड वसुली करण्याबाबत कागदोपत्री आदेश काढला. हा आदेश सोमवारी बोईसर मंडळ अधिकारी यांना प्राप्त झाला कारण शनिवारी व रविवारी बोईसर मंडळ अधिकारी कार्यालय बंद होते.
तहसीलदार यांनी आपले कर्तव्य बजावत सुट्टीच्या दिवस असला तरी काय झाले शासनाच्या तिजोरीत महसूल जमा व्हावा या भावनेने पुढील कार्यक्रम पार पाडला. चोरटी वाहतूक करणाऱ्या सात पैकी तिन वाहनात प्रत्येकी फक्त दोन ब्रास मुरुम असल्याने आदेशात दाखवून 6 लाख 33 हजार 870 रूपयाचा दंड वसुल करण्याबाबत कुकडे तलाठी यांना आदेश दिले होते. मात्र हा आदेश फक्त कार्यालयाची कागदोपत्री कामे पुर्ण करण्यासाठी काढला असल्याचे उघड झाले आहे. मुरुमाची चोरटी वाहतूक करणाऱ्या एन.जी. प्रोजेक्ट लि. या कंपनीकडून तलाठ्यांना आदेश मिळण्यापूर्वीच दंडाची रक्कम रविवारी सुट्टीच्या दिवशी वसुल करून तहसीलदार यांनी बोईसर पोलिस ठाण्यात असलेली सात हायवा ट्रक सोडण्यासाठी आदेश दिले. यानुसार बोईसर पोलिस 30 जानेवारी रोजी वाहने सोडून दिली. विशेष म्हणजे कारवाई साठी गेलेल्या बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक यांना देखील वाहने नेमकी कधी सोडली याबाबत माहिती नसल्याचे सोमवारी दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे तहसीलदार सुनिल शिंदे यांनी तत्परतेने केलेले दंड वसुलीचे काम व सुट्टीच्या दिवशी सोडलेली वाहने याच प्रमाणे बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी कायदेशीर कारवाई अशाच प्रकारे का केली नाही हा सवाल उपस्थित केला जात आहे.
◾️रेल्वे कॉरिडॉर च्या कामात मुरुम भरावाचा ठेका घेणाऱ्या एनजी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने मौजे राणीशिगाव येथील गट क्रमांक 54 या आदिवासी खातेदार जगन्नाथ चिंटू माळकरी यांच्या जागेतील मुरूम उत्खननाचा स्वामित्वधन परवाना घेतला होता. मात्र प्रत्यक्ष जागेवर उत्खनन न करताच त्या गावा पुढील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खानिवडे गावातील गट क्रमांक 60/1 प्रमोद चिखलीकर यांच्या मालकीच्या जागेतून जमीन मालकाच्या परवानगी ने चोरट्या पद्धतीने दहा ते पंधरा हायवा ट्रकने चोरटी वाहतूक रेल्वेच्या कामासाठी केली असल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात आदिवासी जागेवर दिलेली नियमबाह्य उत्खनन परवानगी व इतर ठिकाणी केलेले बेसुमार खोदकाम यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार का हा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.
◾️ तहसीलदार यांनी त्यांच्या आदेशात तीन वाहनांमध्ये प्रत्येकी 2 ब्रास मुरुम असल्याने म्हटले आहे. मात्र ही वाहने संपूर्ण मुरुम भरलेल्या अवस्थेत पोलिस ठाण्यात आणली होती. या हायवा वाहनात साधारण 6 ब्रास मुरुम राहतो यामुळे तहसीलदार यांनी आकारलेल्या दंडावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. यातच कमी मुरुम असल्याचे दाखवून तहसीलदार यांनी नेमका कोणता सुवर्णमध्य काढला हा संशोधनाचा भाग आहे. यातच वाहने पोलिस ठाण्यात जमा करताना वाहनात किती मुरुम मातीचा साठा होता पोलिसांनी स्टेशन डायरीत काय नोंद केली असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.
◾️ वाहनांवर केलेल्या कारवाईत तीन वाहनात असलेल्या मुरुम माती प्रमाणे दंड आकारून दंड वसुल झाल्यानंतर वाहने सोडण्याबाबत बोईसर पोलिसांना आदेश दिले होते. तसेच बेकायदेशीर केलेल्या खोदकामा बाबत कारवाई बाबत तलाठी यांना सांगितले आहे.
— सुनिल शिंदे, तहसीलदार पालघर