◾️झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला बोईसर-पालघर मध्ये महाराष्ट्र शासनाची मान्यता
◾️शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: जिल्ह्यातील अतिशय वेगाने नागरीकरण झालेल्या बोईसर व पालघर मध्ये गेल्या 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत घरांचे बांधकाम झाले असून याभागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी उभी राहिली आहे. अनधिकृत बांधकाम करून उभारलेल्या वस्त्यांमध्ये नागरी सुविधांन बरोबरच अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. कमी किमतीत स्वत:चे घर मिळते म्हणून अनेकांनी अनधिकृत चाळीत घरे खरेदी केली. मात्र त्यांच्यावर अतिक्रमण विरूद्ध कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असल्याने याभागात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मान्यता द्यावी अशी मागणी शिवशक्ती सामाजिक संघटनेकडून करण्यात आली होती. राज्य शासनाने याला मान्यता दिल्याने येणाऱ्या काही वर्षांत झोपडपट्टी च्या जागी इमारती याभागात उभ्या राहणार आहेत.
पालघर सह बोईसर भागात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात झोपड्या उभ्या राहिल्या असून काही भुमाफियांनी शासकीय जागेवर उभारलेल्या घरांची देखील विक्री केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न तसाच प्रलंबित असून अनधिकृत घरांचे बांधकाम करून गरीब लोकांना त्यांची विक्री करून भुमाफिया मोकळे झाले आहेत. परिणामी या अनधिकृत घरांवर कारवाई केव्हाही होऊ शकते यामुळे आपल्या डोक्यावरील छत कधी जाईल याची शाश्वती गरीब जनतेला नाही. बोईसर शहरातील बाजूला असलेल्या सरावली भागात देशाच्या विविध भागातून आलेले कामगार वर्ग असून यामध्ये महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. यातच कोकण पट्टयातील कामगार वर्गाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. नोकरी निमित्ताने बोईसर भागात आलेल्या लोकांनी याच भागात अनधिकृत झोपडपट्टी भागात घरे घेवुन याठिकाणी राहत आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्र असताना देखील शासनाने कामगारांना राहण्यासाठी किंवा त्याबाबत जागेची कोणत्याही प्रकारची विशेष सुविधा केलेली नाही. याअगोदर काही ठिकाणी मोठ्या उद्योजकांना कामगार वसाहती साठी जागा मंजूर केल्या मात्र त्या बड्या लोकांच्या कब्जात असल्याने सर्वसामान्य कामगार मात्र तसाच राहिला आहे. तारापूरात औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची संख्या वाढत गेली मात्र कामगारांच्या वसाहती कडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी येथील कामगारांनी कमी किंमतीत घरांचा शोध घेत अनधिकृत बांधकाम असलेल्या झोपडपट्टी चाळी भागात निवारा शोधला होता. यामुळे बोईसर आणि सरावली ग्रामपंचायत अंतर्गत अशा अनेक झोपडपट्टी क्षेत्राचा अंतर्भाव होत असून येथील झोपडी धारकांना झोपडपट्टी पुर्नवसन योजनेअंतर्गत नेमून स्वतःचे हक्काचे घर मिळण्याची मागणी शिवशक्ती सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कडे करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असुन आता अनधिकृत घरात असलेल्या नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
◾️ झोपडपट्टी पुनवर्सन योजनेमुळे बोईसर सरावली भागातील साधारण 20 हजार पेक्षा जास्त अनधिकृत घरांना त्याचा उपयोग होऊन साधारण 150 एकर पेक्षा जास्त भागाचा कायापालट होऊ शकतो. गृहनिर्माण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे बोईसरचे झोपडपट्टीचे चित्र बदलणार असल्याने या निर्णयाचे मुळे नागरीकांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे बोईसरच्या तमाम जनतेच्या वतीने आभार मानण्यासाठी शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील, मिलिंद वडे, अतुल देसाई यांनी भेट घेतली.