◾️ यशवंत संकल्प विकासकांने शासनाचा महसूल बुडवून केली जागेची नियमबाह्य विक्री; रहिवासी वापरासाठी बिनशेती केलेल्या जागेची कारखाने उभारण्यासाठी विक्री
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्राच्या लगत असलेल्या एका विकासकांने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील रहिवासी वापरासाठी बिनशेती केलेल्या जागेवर वास्तुविशारद कडून बेकायदेशीर पणे नियमबाह्य भुखंड बनवून त्यांची औद्योगिक वापरासाठी विक्री केल्याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या बिनशेती परवानगीचा भंग केल्याने बिनशेती परवानगी नियमानुसार रद्द करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे. रहिवासी भागात अनधिकृत कारखान्यांची उभारणी सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या लगत असलेल्या सर्वे नंबर 55 याभागात रहिवासी वापरासाठी बिनशेती परवानगी घेवून त्याठिकाणी यशवंत संकल्प या वसाहतीची उभारणी केली आहे. याच वसाहती मध्ये नियोजित इमारतीची जागा विकासकांने बेकायदेशीर पणे कारखाने उभारण्यासाठी विक्री केली आहे. प्रत्येक्षात सातबारा मध्ये रहिवासी वापरासाठी जागा असल्याचा उल्लेख असताना देखील औद्योगिक वापरासाठी जागेची विक्री करताना मुद्रांक नोंदणी विभागाने याची नोंदणी कशी केली हा प्रश्न उपस्थित राहत आहे. बिनशेती झालेल्या जागेवर वास्तुविशारद यांच्या कडून जागेच्या विविध मापाचे भुखंडाचे नकाशे बनवून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा विक्री केली. महत्त्वाचे म्हणजे यातील काही विक्री झालेल्या जागेच्या सातबारा फेरफार बाबत बोईसर मंडळ अधिकारी यांच्या कडे अर्ज देखील करण्यात आल्याचे समोर आले असून बिनशेती आदेशाचा केलेला भंग याबाबत कोणताही अहवाल मंडळ अधिकारी कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला नाही.
पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडून रहिवासी वापरासाठी घेतलेली बिनशेती परवानगी व प्रत्येक्षात उभारलेले अनधिकृत कारखान्यांन कडे महसूल विभागाने आजवर दुर्लक्ष का केली हा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. रहिवासी वापरासाठी बिनशेती केलेल्या जागेची कारखाने उभे करण्यासाठी विक्री करताना जिल्हाधिकारी यांच्या कडून सुधारित बिनशेती परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून जागेची विक्री केली. यातच याठिकाणी मोठमोठे बेकायदेशीर कारखाने उभे केले असून बांधकाम परवानगी तसेच स्वामित्वधनाचे लाखो रूपये बुडवले आहेत. एकदोन गाड्या मातीचा भराव झाल्यानंतर कारवाई साठी तत्पर असलेले पालघर महसूल विभागाचे अधिकारी मात्र शेकडो ट्रक मातीचा बेकायदेशीर भराव झाला असताना देखील दुर्लक्ष करतात हा याचा तपास आता पालघर जिल्हाधिकारी यांनीच करायला हवा.
◾️ भंगाराचा बेकायदेशीर साठा
बिनशेती आदेशाचा भंग करून उभारलेल्या गोडाऊन मध्ये भंगाराचा बेकायदेशीर साठा ठेवला जात आहे. भिवंडी मध्ये चोरी केलेला मोटर मधील मुख्य आरोपी हा देखील येथील आपल्या साथीदारा सोबत भंगाराचा व्यवसाय करतो. यामुळे या जागेचा अवैध धंद्यांन साठी मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. एकांत असलेल्या याभागात सहसा कोणाचे लक्ष जात नाही. यामुळे बेकायदेशीर धंद्यांना याठिकाणी बढावा मिळू शकतो. यामुळे जिल्हाधिकारी यांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.