◾️तहसीलदार सुनील शिंदे यांनी तोडलेले अनधिकृत बांधकाम पुन्हा उभे; तलाठ्यांनी अहवाल पाठवून देखील तहसीलदार करतात कारवाई कडे दुर्लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने भुमाफियांनी जोमाने अनधिकृत इमारती उभारणी सुरू केली आहे. महसूल विभागाचे अधिकारी देखील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकाकडे दुर्लक्ष करत असल्याने भुमाफियांचे फावत चालले आहे. राजकीय दबावामुळे स्थानिक तलाठी देखील कारवाई करण्याचे धाडस करत नसून अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत अहवाल तहसीलदार यांच्या कडे सादर करतात मात्र वर्षानुवर्षे अहवाल तसेच धुळखात पडून असल्याने भुमाफिया मोकाट सुटले आहेत. यातच वर्षभरापूर्वी खुद्द तहसीलदारांनी तोडलेल्या इमारतीचे बांधकाम पुन्हा उभे राहिले आहे.
शासकीय पगार कमी पडत असल्याने लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या पालघर तालुक्यातील महसूल अधिकारी आपले कर्तव्य देखील विसरून गेले आहेत. गेल्या दोन वर्षात एखाद दोन तुटपुंज्या कारवाया सोडल्या तरी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई अनधिकृत बांधकामावर केलेली नाही. विशेष म्हणजे एखाद दुसऱ्या केलेल्या कारवाई च्या ठिकाणी पहिल्या पेक्षा अधिक बांधकाम होऊन पुन्हा इमारती उभ्या राहिल्या असून पालघर तहसीलदार यांनी सोईस्कर पणे याकडे दुर्लक्ष केले आहे. बोईसर शहरात देखील मुख्य रस्त्यालगत अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असताना देखील स्थानिक तलाठी याकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे बोईसर मंडळ अधिकारी कार्यालया बाहेर व आजुबाजुला काही अंतरावर देखील अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली असताना देखील याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष का केले हा चौकशीचा भाग आहे.
बोईसर महसूल मंडळ कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर, भैयापाडा, आजाद नगर, संजय नगर, धोडी पाडा अशा अनेक भागात जोरदार पणे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर व आदिवासी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. मागील वर्षी पालघर तहसीलदार सुनिल शिंदे यांनी एक दिवसाची कारवाई करत येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बांधकामावर कारवाई केली होती. मात्र काही महिन्यायच याठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम उभे राहिल्याने महसूल विभागाने तडजोड केली का असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामावर कारवाई साठी अहवाल देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या कडे पाठवले आहेत. मात्र तालुक्याचा पदभार डोईजड होत असल्याने गेल्या दोन वर्षापासून तहसीलदार यांना कारवाईचे आदेश काढण्यासाठी वेळच मिळालेला नाही.
अवधनगर येथील मुख्य रस्त्यावर तहसीलदार यांनी केलेल्या कारवाई नंतर आठवडा भरातच पुन्हा बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक तलाठी यांनी बांधकाम तोडून जागेचा शर्तभंग केला म्हणून कारवाई बाबत अहवाल त्याचवेळी पालघर तहसीलदार यांच्या कडे पाठवला होता. मात्र त्यावर देखील वर्ष उलटून जात आले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे आठवडाभरापुर्वी एखाद्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर त्यावर तहसीलदार यांच्या कडे अहवाल पाठवला जातो. तहसीलदार अशा अहवालानुसार नोटीस काढून सुनावणी घेण्याचा प्रताप करतात. प्रत्येक्षात सरकारी जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामावर त्याचवेळी स्थानिक महसूल विभागाने किंवा तहसीलदार यांनी कारवाई करणे अपेक्षित असते परंतु कायद्यातील पळवाटा शोधून महसूल विभागाचे अधिकारी अनधिकृत बांधकामा मार्फत जे काही पदरात पडेल यासाठी सुवर्णमध्य काढत असल्याने बोईसर शहर दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामाचे हब झाले आहे.
◾️पालघर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज
टाळेबंदीत परप्रांतीय कामगारांना लाथ मारून मारहाण करणाऱ्या तहसीलदार सुनिल शिंदे यांच्या वर आघाडी सरकारने कारवाई करण्याचा दिखावा केला होता. यावेळी महिनाभरातच सुनिल शिंदे यांना पुन्हा पालघरचा पदभार दिला. यामुळे माझे कोणीही वाकडे करू शकणार नाही याच भ्रमात तहसीलदार असल्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी देखील कसुर करत सरकारी जागा गिळंकृत करणाऱ्या माफिया मोकळीक मिळत आहे. यामुळे आता सरकारी जागा वाचवण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांनीच आता लक्ष देण्याची गरज आहे.