◾️कामगार युनिटने सदस्यत्व सोडण्यासाठी कामगारांवर उद्योजकांचा दबाव; नेहमी प्रमाणे बोईसर पोलिस उद्योजकांच्या बाजूने असल्याचा आरोप
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: शासनाचे सर्व निर्बंध धुडकावून अधिकाऱ्यांना आर्थिक मजबूत करून कामगारांचे शोषण करणाऱ्या विराज प्रोफाइल कंपनीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. येथील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कामगारांनी एकत्र येऊन युनियनची स्थापन केली होती. मात्र स्थानिक राजकीय नेत्यांचे असलेले पाठबळ यामुळे या मुजोर उद्योजकांने कामगारांना दबाव टाकून कामगार युनिटचे सदस्यत्व सोडण्यासाठी खटाटोप सुरू केला होता. याच्या निषेधार्थ बुधवारी कारखान्यांच्या मुख्य प्रवेश द्वारावर आंदोलन करण्यात आले.
बोईसर पुर्वेला वारांगडे येथे असलेल्या विराज प्रोफाइल लिमिटेड या कारखान्यात मुंबई लेबर युनियनचे सभासद असून याठिकाणी कामगार युनियनची स्थापना करण्यात आली होती. यातच कामगारांमध्ये मुंबई लेबर युनियनच्या प्रभावाची जाणीव विराज प्रोफाइलच्या व्यवस्थापनाला झाली होती. त्यामुळे मुंबई लेबर युनियनचे विघटन करण्याचे प्रयत्न व्यवस्थापना मार्फत केले जात होते. परंतु व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना कामगारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि मालकांकडून मंगळवार पासून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कामगारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप मुंबई लेबर युनियन कडून करण्यात आला आहे. कारखाना व्यवस्थापना अंतर्गतच्या युनियनचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी कामगारांवर दबाव टाकण्यास सुरूवात करण्यात आली होती. रात्री-बेरात्री कामगारांच्या घरी जाणे, कामाच्या ठिकाणी सही करेपर्यंत कामगारांवर दबाव टाकणे आदी अनैतिक मार्गांचा वापर सुरू करण्यात आला होता.
बोईसर पोलिस व विराज प्रोफाइल हे गणित गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट असून पोलिसांना पुढे करू हा उद्योजक कामगारांना वेठीस धरत असल्याचा अनेकदा आरोप करण्यात आला होता. यावेळी देखील मुंबई लेबर युनियन कडून बोईसर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आला असून कामगारांच्या पिळवणूकीत कारखाना व्यवस्थापनाला बोईसर पोलीसांकडून मदत मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कामगारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कामगारांच्या एकजुटीचे खच्चीकरण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने बुधवार पासून कोणत्याही पूर्वसूचने शिवाय कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून निदर्शने करण्यास सुरूवात करण्यात आली आल्याची माहिती मुंबई लेबर युनियनचे सरचिटणीस सुशील नायक आणि चिटणीस संजीव पुजारी यांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.