पालघर दर्पण : प्रतिनिधी
वसई : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून वसई तालुका पत्रकार संघाची सभा घेण्यात आली नव्हती. संघाच्या २मार्च रोजी वसई रोड येथे झालेल्या सभेत संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा संदीप पंडित यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सचिव आशिष राणे व खजिनदार अरूण सिंग यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सभेत यावेळी वार्षिक सभा, विविध उपक्रम, नवे सदस्य, नवीन कार्यकारणी व सदस्यांच्या हितासाठी असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तर वसई तालुका पत्रकार संघाच्या एकूणच कामकाजाबाबत संघाचे सचिव आशिष राणे यांनी माहिती दिली.
सर्वांच्या सहमतीने यावेळी संघाच्या उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार भरत म्हात्रे यांची निवड करण्यात आली. तर कार्यालय प्रमुखपदी नितांत राऊत यांची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे नियम व अटींचे पालन करून नवीन सदस्यांच्या संघात घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. वसई तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवून अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा निवड केल्याबाबत संदीप पंडित यांनी सर्वांचे आभार मानले व संघामार्फत विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे बोलताना सांगितले.