पालघर दर्पण : प्रतिनिधी
पालघर: केळवा समुद्रात बुडत असलेल्या केळव्यातील स्थानिक मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या नाशिक येथील चार तरूणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
केळवे येथील आदर्श विद्या मंदिर मध्ये आठवीत शिकणारा अथर्व नाकरे हा केळवे समुद्र पोहत असताना तो पाण्याच्या प्रवाहाने बुडत होता. जीव वाचविण्यासाठी अथर्व मदतीचा आवाज करत आहे हे पाहिल्यानंतर नाशिक येथून केळवा येथे सहलीला आलेल्या ओम विसपुते (17 वर्षे),कृष्णा शेलार(17 वर्षे),दीपक वडकाटे (17 वर्षे),अभिलेश देवरे(17 वर्षे) या चौघांनी त्या लहान मुलाला वाचवण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता समुद्रात उड्या घेतल्या होत्या. परंतु पाण्याच्या प्रवाहाने त्यांचाही जीव घेतला आहे. त्याच्यासोबत ओम विसपुते व अथर्व नाकरे ओम विसपुते व दीपक वडकाटे या चौघांचा मृत्यू झाला आहे. अभिलेश देवरे हा मात्र सुखरूप किनाऱ्यावर आला. हे सर्वजण नाशिक येथील असून 17 वर्षे वयाचे विद्यार्थी आहेत. ओम, कृष्णा, दीपक हे विद्यार्थी ब्रम्हा व्हॅलीत सायन्सचे शाळेतील विद्यार्थी होते. चौघांचे शव माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सुरुवातीला दोघा मुलांचे मृतदेह सापडले होते व दोघे जण मिसिंग होते. युद्धपातळीवर शोध मोहीम केल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. सुमारे 40 विद्यार्थी व काही शिक्षक पर्यटनासाठी केळवे बीचवर आले होते.