■नियम धाब्यावर बसवुन ५ प्रवाशांची वाहतूक; पोलिसांचे संगणमत, नागरिकांचा आरोप.
पालघर दर्पण वार्ताहर
नालासोपारा: शहरात असणाऱ्या रिक्षावाल्यांच्या मुजोरपणामूळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेसुमार वाढलेल्या रिक्षा व नाक्या नाक्यावर असलेल्या यूनियन, राजकीय पक्षांचे असलेले संबंध यामुळे या रिक्षावाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असुन वाहतूक पोलिसांकडून वेळीच याला वेसन घातली नाही तर भविष्यात हि बाब त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नालासोपाऱ्यात वाहनांची संख्या वाढली असून वाहतूक कोंडी हि जटील समस्या बनली आहे. त्यात आणखी एक समस्या डोके वर काढत आहे. ती म्हणजे रिक्षाचालकांची मुजोरीवृत्ती. रिक्षा चालकांच्या मुजोरीवृत्ती मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही रिक्षाचालक तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे सुद्धा दाखल आहेत. मात्र या मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करण्यासाठी दिरंगाई करत आहेत असा आरोप नागरिकांनकडून केला जात आहे.
नालासोपारा पूर्वेकडे ब्रिजखाली अनधिकृत रिक्षाचालकाचा देखीलब सुळसुळाट असून रिक्षा बिनधास्त रस्त्यावर आडव्या-उभ्या करून रस्ता अडविला जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. या रिक्षावाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र असेल असून देखील वाहतूक पोलीस याबाबीकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील एस टी डेपो, हनुमान नगर, छेड़ा नगर, शांती पार्क, श्री प्रस्था या विभागात जाणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः हे रिक्षावाले रात्रीच्या वेळी रिक्षा भाडे जास्तीचे घेतात. पूर्वेकडील रिक्षावालेही प्रवाशांना अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. यांच्याकडे पूरक कागदपत्रे नसून सुद्धा बेकायदेशीर रिक्षा चालवतात. अनेकदा गि-हाईकांशी दादागिरी मोठ्या प्रमाणात हेच रिक्षावाले करतात. दिवसा बंद असलेले टमटम रात्रीच्या वेळी बिनधास्त प्रवाशांची वाहतूक करतात. या रिक्षावाल्याना वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यामुळे यांचे फावते आहे. मात्र नागरिकांच्या या समस्येवर योग्य तोडगा काढावा अशी नागरिकांची मागणी आहे.
■ मुजोर रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद
रिक्शावाले मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून प्रत्येक रिक्षात ३ प्रवाशी नेण्याचा नियम असतानाही ४ ते ५ प्रवाशी बसवून नेतात. वाहतूक पोलिस या गोष्टीकडे बघत काना डोळा करुण रिक्षावाल्याना बगल देतात. महिन्याकाठी रिक्षावाल्यांकडून काही पैसे घेत असल्यामुळे या अनधिकृत रिक्षांवर कारवाई केली जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे. या अनधिकृत रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर यांना वेळीच आवर घातला जाईल. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी असेल त्या ठिकाणी वाहतूक पोलिस असणे आवश्यक असताना सुद्धा येथे कोणीही पोलिस नसतो. रात्रीच्या वेळी बॅच, परमीट नसलेल्या अनधिकृत रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसतो आहे.
■ रात्रीच्या वेळी वाहतूक पोलीस नसल्याचा गैरफायदा घेऊन महिला प्रवाश्याकडून हे मुजोर रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. यामुळे सर्वात जास्त फटका महिला प्रवाशांना पडतो.
— मनीषा वाडकर – (महिला प्रवासी)
रात्री अपरात्री एकटी महिला रिक्षातून प्रवास करत असेल तर मुद्दामुन जोरात गाणी लावली जातात. ही गाणी कधी कधी अश्लील सुद्धा असून कर्णकर्कश आवाजात हे मुजोर रिक्षाचालक वाजवतात.
— गायत्री सावंत (महिला प्रवाशी)