◾ तारापुर औद्योगिक क्षेत्रातील अनामाई फार्मा कारखान्याला आग
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एका फार्मा कारखान्याला आग लागली. औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाने आगीवर तातडीने नियंत्रण आणल्याने मोठी हानी टळली असुन कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
औद्योगिक क्षेत्रातील अनामाई फार्मा प्रा.लिमिटेड प्लाँट नं के 37 या औषधाचा कच्च्या माल बनविणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागली. मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने तातडीने नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थाचा साठा बेकायदेशीर पणे ठेवल्याचे दिसून आले आहे. यातच कारखान्यात लागलेली आग येथील रसायन साठ्याची टाकी फुटल्याने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक क्षेत्रातील फार्मा, एपीआय व बल्क ड्रग्जचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्या व्यतिरिक्त देखील अनेक कारखाने सुरू आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा अनेक विभागांना विश्वासात न घेताच पालघर जिल्हाधिकारी यांनी अनावश्यक उद्योग सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे. मंगळवारी कारखान्याला ज्यावेळी आग लागली त्यावेळी कारखान्यात 8 ते 10 कामगार उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.