◾️ पहाटे सुमारे 3 किलो गांजा ताब्यात
◾️बोईसरचे पोलिस रात्रीच्या वेळी संपर्क क्षेत्राच्या बाहेर; पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रूमला संपर्क साधल्यावर घटनास्थळी आले पोलिस
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: रात्री उशिरा नंतर बोईसर पोलिस ठाण्याचे अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर जात असल्याचे एका घटनेनंतर दिसून आले आहे. एका जागृत पत्रकाराकडे बोईसर मधील धनानीनगर भागात गांजाचा साठा असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून प्राप्त झाली होती. यासाठी त्याच क्षणी बोईसर पोलिस ठाण्यासह सर्व अधिकाऱ्यांना संपर्क साधून देखील कोणाचाही संपर्क झाला नाही. मात्र पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रूमला संपर्क साधल्या नंतर पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळवुन देखील त्यांनी कारवाई बाबत दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.
अमली पदार्थ माफियांन कडे बोईसर पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता पत्रकारांनी या माफियांचा पर्दाफाश करण्याचा विडा घेतला आहे. बोईसर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री केली जात असल्याचे याअगोदर देखील उघडकीस आले असून याबाबत पत्रकारांच्या मदतीने आणखी एक मोठी कारवाई पोलिसांना करता आली आहे. बोईसर धनानी नगर ड्रीम सिटी येथील एका रहिवासी सदनिकेत व पार्किंग मध्ये असलेल्या स्कुटरच्या डिक्की मध्ये गांजाचा साठा असल्याची माहिती पत्रकार प्रमोद तिवारी यांना गुरूवारी 7 एफ्रील रोजी रात्री उशिरा प्राप्त झाली होती. माहितीचे गांर्भीय लक्षात घेवून त्यांनी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना संपर्क साधला मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यातच बोईसर पोलिस ठाण्याचा फोन देखील बंद होता. यासाठी शुक्रवारी पहाटे 1 वाजून 30 वाजता पत्रकार तिवारी हे बोईसर पोलिस ठाण्यात गेले मात्र त्याठिकाणी देखील ठाणे अंमलदार याठिकाणी उपस्थित नव्हते व इतर दरवाजे मधुन बंद असल्याचे दिसून आले. यातच स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक आशिष पाटील यांना संपर्क साधला असता व त्यांना सर्व माहिती सांगितली असता त्यांनी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत त्यानंतर पत्रकार तिवारी यांचे फोन उचलले नाही.
अवैध धंद्यावर कारवाई साठी बोईसर पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्यावर क्षणाचाही विलंब न लावता पहाटे 1 वाजुन 44 वाजता पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रूमला फोन करून सर्व माहिती देण्यात आली. त्यानंतर धनानी नगर येथील ड्रिम सिटी येथील इमारतीत 2 वाजुन 15 मिनिटांनी पोलिस दाखल झाले. गांजा माफिया गणेश स्वामी उर्फ अन्ना यांचा दरवाजा पोलिसांनी वाजवला असताना देखील साधारण 2 तास त्यांने दरवाजा खोलला नाही. त्यानंतर इमारती मधील इतर लोक जागे झाल्यानंतर त्यांने दरवाजा खोलला त्यावेळी पोलिसांनी झाडा झडती घेतल्यावर सुरूवातीला त्याच्या खोलीत काही आढळून आले नाही. मात्र पोलिसांनी अधिक तपास घेत शौचालय तपासणी केली असता प्लैश टँक मध्ये 900 ग्राँम गांजा सापडला तसेच इमारती मधे उभ्या असलेल्या स्कुरच्या डिक्की मध्ये सुमारे 2 किलो पेक्षा अधिक असा एकुण साधारण 3 किलो गांजाचा साठा हा आढळून आला आहे. कारवाई बाबत माहिती पहाटेच्या वेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांना दिल्यानंतर साधारणपणे तासभर फोन वर अनेकदा चाललेल्या संभाषणा नंतर पहाटे 4 वाजता बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील घटनास्थळी आल्याचे पत्रकार तिवारी यांनी सांगितले आहे. आरोपीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
◾️गांजा माफिया गणेश स्वामी उर्फ अन्ना यांने आपल्या मोबाईल फोन वरून इतरही अमली पदार्थ माफियांना संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली आहे. यातच बोईसर पोलिसांनी गांजा माफिया गणेश स्वामीचा फोन ताब्यात घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा घटनेमध्ये अनेकदा मुळापर्यंत जाऊन बोईसर मध्ये तपास झाल्याचे आजवर कधी दिसून आले नाही. यामुळे या अमली पदार्थ रँकेट मध्ये मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची गरज असुन बोईसर पोलिस या माफियांच्या मोबाईलच्या आधारे कोणाकोणाला ताब्यात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾️ पत्रकारांना मिळालेल्या माहितीनुसार गांजा माफिया गणेश स्वामी उर्फ अन्ना यांच्या स्कुरच्या डिक्की मध्ये दोन किलो गांजा व घरामध्ये मोठा साठा असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस ज्यावेळी कारवाई साठी याठिकाणी गेले तेव्हा त्यांने साधारण दोन तास दरवाजा खोलला नाही. याच वेळेत त्यांने शौचालयात गांजाची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दृष्टीने देखील तपास पोलिसांनी करायला हवा.