◾️बोईसर पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे धक्का लगत होते अमली पदार्थ विक्री; बोईसरचे गुन्हे प्रगटीकरण विभाग करते तरी काय
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या माफियांनी हैदोस माजवला असला तरी बोईसरचे पोलिस हताशपणे त्याकडे पाहत असल्याचे दिसून येते. बुधवारी रात्रीच्या वेळी बोईसर पालघर रस्त्यालगत रेल्वे धक्का भागात काही लोक अमली पदार्थांचे सेवन व विक्री साठी आले असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रूमला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी एक दुचाकी घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे.
बोईसर शहरात गेल्या अनेक महिन्यांन पासुन अमली पदार्थ विषय चर्चेत असला तरी याकडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष असले तरी सामाजिक जान असलेल्या पत्रकारांनी याकडे लक्ष दिले आहे. बुधवारी 13 एफ्रिल रोजी रात्री 10 वाजता बोईसर पालघर रस्त्यावर औद्योगिक क्षेत्राच्या असलेल्या जागेवर रेल्वे धक्का भागात काही इसम अमली पदार्थ सेवन व विक्री साठी जमले असल्याचे दिसून आले होते. याबाबत पत्रकारांनी लागलीच पोलिस मुख्य कंट्रोल रूमला संपर्क साधुन माहिती दिली होती. यानुसार बोईसर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यासाठी उपस्थित झाले. यातच पोलिस सायरन वाजवत आल्याने याठिकाणी असलेल्या अनेकांनी पळ काढला त्यातच एक दुचाकी चालत देखील पळून जाण्यासाठी यशस्वी झाला. मात्र याठिकाणी एक दुचाकी स्कुटर याच ठिकाणी राहिली होती. बोईसर पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेतली असून बोईसर रेल्वे स्टेशन चौकीवर ही दुचाकी आणण्यात आली आहे.
बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेली दुचाकी अमली पदार्थ विक्री करण्याचा आरोप असलेल्या सुर्वे टिम मध्ये असलेल्या माया नावाच्या इसमाच्या भावाची दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुचाकी स्कुटर अन्या नावाचा अमली पदार्थ विक्री करणारा हा मायाच्या भावा कडून घेवून गेला होता. यातच खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरावली धोडीपाडा येथे राहणारा माया हा सुर्वे याचा कारोबार पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय वरदहस्त मुळे पोलिस देखील याच्या कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमातून अमली पदार्थ विक्री बाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बोईसर पोलिसांनी आजवर केलेले दुर्लक्ष याबाबत देखील अनेक बातम्या पुराव्यानिशी प्रसिद्ध झाल्या असल्या तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना मात्र बोईसर पोलिसांन कडे लक्ष देण्यासाठी आजवर वेळच मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.
◾️गुन्हे प्रगटीकरण विभाग करतो तरी काय..
बोईसर शहरात काही दिवसापूर्वी पत्रकाराच्या मदतीने गांजाचा मोठा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मात्र हे सर्व गांजा विक्री करणारे खुलेआम पणे हा कारोबार चालवत असताना याचा थोडाही ठावठिकाणा बोईसरच्या गुन्हे प्रगटीकरण विभागाला लागला नाही हे विशेष आहे. यातच मागील काही महिन्यापूर्वी याच विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांने नागरिकांनी केलेल्या तक्रारी बाबत कारवाई करताना बनावट पंचनामा करून अमली पदार्थ विक्रिचा आरोप असलेल्या निलेश सुर्वे या इसमाला मोकळीक दिली होती. यामुळे वरिष्ठ पोलिसांनी या गुन्हे प्रगटीकरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांंची चौकशी करणे गरजेचे आहे. यातच याच विभागातील काही पोलिस अमली पदार्थ विक्री करणाऱ्या माफियांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली असुन याबाबत सत्यता पडताळणी करून कारवाई होणे आवश्यक आहे.