◾️सरावली ग्रामपंचायत हद्दीतील धोडीपाडा याठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू; वाणिज्य वापरासाठी महिन्याभरात उभारले अनधिकृत गाळे
◾️सरावली ग्रामपंचायत व जिल्हा प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; न्यायालयाचे आदेश धुडकावून जागेवर बांधकाम
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील धोडीपाडा याठिकाणी बेकायदेशीर बांधकाम जोमाने सुरू असले तरी ग्रामपंचायत प्रशासना बरोबरच जिल्हा प्राधिकरणाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. गावठाण जागेच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकाम याठिकाणी सुरू असुन महिन्याभरातच वाणिज्य वापरासाठी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यातच धोडीपाडा याठिकाणी असलेल्या जागेवर बांधकाम करण्यासाठी मनाई आदेश पालघर न्यायालयाने दिले असताना देखील याठिकाणी न्यायालयाचे आदेश धुडकावून बांधकाम करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम करण्यासाठी नंबरवर असलेल्या सरावली ग्रामपंचायत मध्ये काही ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी यांचीच बांधकामे अनधिकृत असल्याने इतर बांधकामाला देखील सोईस्कर रित्या पाठबळ दिले जात आहे. येथील धोडीपाडा याठिकाणी असलेल्या घर क्र. 2180 ‘क’ याभागात असलेल्या जागेवर गेल्या काही दिवसापूर्वी बांधकाम सुरू करण्यात आले होते. याअगोदर याठिकाणी अनधिकृत गाळे बांधकाम करण्यात आले होते. मात्र आता हे गाळे तोडून त्याठिकाणी अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय कारवाई होऊ नये यासाठी महिन्याभरातच बांधकाम उरकले असुन हे अनधिकृत गाळे भाडेतत्त्वावर देखील देण्यात आले आहेत. असे असले तरी सरावली ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यातच सरावली हा विभाग जिल्हा प्राधिकरणात येत असल्याने याठिकाणी बांधकाम करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र कोणत्याही विभागाची परवानगी न घेताच अनधिकृत बांधकाम जोमाने सुरू आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील धोडीपाडा याठिकाणी असलेल्या गावठाण जागेवर याअगोदर देखील अतिक्रमणे करून नियमापेक्षा अधिक जागा बळकविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेली गावठाण जागा एका आदिवासी खातेदारांने विकत घेतली होती. मात्र बाजूला असलेल्या एका गुंडगिरी करणाऱ्या इसमाने त्यावर कब्जा करून अनधिकृत बांधकाम करून व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम केले होते. यातच राजकीय पाठबळामुळे याठिकाणी अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई कोणताही विभाग करत नाही. जागा मालक गुलाब अशोक वावरे यांनी आपल्या जागेवर जबरदस्तीने गाळ्यांचे अनधिकृत उभारल्या बांधकाम सुरू असल्या बाबत 11 डिसेंबर 2017 मध्ये तक्रार तहसीलदार पालघल यांच्या कडे दाखल केली होती. त्यानुसार 8 जानेवारी 2018 रोजी तहसीलदार पालघर यांनी सरावली ग्रामपंचायतीला लेखी आदेश देवुन कारवाई बाबत कळविले होते. मात्र ग्रामपंचायतीने याबाबत नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केले.
पालघर तहसीलदार यांनी लेखी कळवुन देखील तिन वर्षाचा कालावधी उलटून जाऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर झालेली नाही. तसेच पालघर दिवाणी न्यायालयात कनिष्ठ स्तरावर याबाबत दावा दाखल असुन प्रलंबित असून सदर दाव्यामध्ये न्यायालयाचे आदेश येईपर्यंत तक्रारदार गुलाब अशोक वावरे यांचे मालकी हक्क कब्जाला अडथळा करू नये असे आदेश दिलेले आहेत. तथापि सदर आदेशाला न जुमानता धोडी यांनी बांधकामाचे साहित्य व बांधकाम केले आहे. असा उल्लेख तक्रारदार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारी नंतर तहसीलदार यांनी दिलेल्या नोटीस मध्ये नमुद करण्यात आले होते. मात्र सरावली ग्रामपंचायतीने देखील याकडे जाणीवपूर्वक राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करत आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व आदेश कागदावरच राहिले असतानाच याठिकाणी पुन्हा जुने बांधकाम तोडून नव्याने इमारतीचे अनधिकृत बांधकाम गेल्या अनेक दिवसापासून सुरू असताना सरावली ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.
◾️गावठाण जागेवर बेकायदेशीर कब्जा करून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम बाबत सरावली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, जागेबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू आहे याबाबत कोणीही नव्याने तक्रार दिली नसल्याने नोटीस काढता आली नाही असे उत्तर दिले. यामुळे अनधिकृत बांधकाम बाबत तक्रार झाल्यावरच ग्रामपंचायत नोटीस बजावणार का असा सवाल उपस्थित होत असुन ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
◾️सरावली ग्रामपंचायत क्षेत्र हे जिल्हा प्राधिकरणात येत असल्याने याठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेची विभागाची देखील घ्यावी लागते. यातच कोणत्याही प्रकारची परवानगी विना याभागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असतानाही जिल्हा प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यातच येथील अभियंता व अधिकारी हे फक्त टेबलावर बसुनच परवानग्या व भोगवटा दाखले देत असल्याने बोईसर सह संपूर्ण भागात नियमबाह्य बांधकामाला देखील उभारी आली आहे.