◾️ बोईसर यशवंतसृष्टी भागात गांजाची केली जात होती विक्री
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात सद्या अमली पदार्थ विक्री करणाऱ्या माफियांनी हैदोस माजवला असून पोलिसांना या माफियांचा ठावठिकाणा लागत नसल्याने पत्रकारांनी गांजा विक्री करणाऱ्या टोळीला पकडून दिले आहे. असाच प्रकार बुधवारी रात्री घडला असुन यशवंतसृष्टी भागात गांजा विक्री करणाऱ्या एकला पत्रकारांच्या मदतीने बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे बोईसर परिसरात अमली पदार्थ विक्री कडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
बोईसर पोलिस ठाणे हद्दीत यशवंतसृष्टी भागात असलेल्या बिल्डींग क्रमांक सात च्या खाली माय प्राँपल्टी आँफिसच्या समोर शाम सहानी नावाचा इसम गांजा विक्री करत असल्याची माहिती पत्रकारांना प्राप्त झाली होती. याबाबत पत्रकार प्रमोद तिवारी यांनी बोईसर पोलिसांना बुधवारी 20 एफ्रिल रोजी रात्री 8 वाजून 4 मिनिटाने फोन करून माहिती दिली होती. यानंतर बोईसर पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी यशवंतसृष्टी भागात रात्री 9 वाजून 10 मिनिटांने आल्यानंतर गांजा विक्री साठी याठिकाणी उभा असलेला शाम सहानी नावाच्या इसमाला गांजा विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले. यावेळी शाम सहानी कडून चार गांजाच्या पुड्या असा 6 ग्राम 743 मीली इतका गांजा ताब्यात घेतला आहे. शाम सहानी सोबत आणखी दोन इसम याठिकाणी उपस्थित होते मात्र ते फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला शाम सहानी हा येथील किंजल इमारती मध्ये राहणारा असुन गेल्या अनेक दिवसापासून हा गांजा विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. पालघर भागातून त्यांने विक्री साठी गांजा आणला असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली असून 150 रूपयाला एक पुडी विक्री केली जात होती. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या या गोरखधंद्या विषयी पोलिसांना कोणताही ठावठिकाणा नव्हता. बोईसर भागात गेल्या पंधरा दिवसांत पत्रकारांच्या सतर्कतेमुळे गांजा बाबत केलेली ही दुसरी कारवाई आहे. महत्त्वाचे म्हणजे बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण विभाग व स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट असताना देखील अमली पदार्थ विक्री करणाऱ्या माफियांचा छडा लावता येत नसल्याचे दिसून येते. यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आता बोईसर मध्ये लक्ष देण्याची गरज आहे.
◾️ बोईसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असुन घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असुन बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.