◾️अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेमध्ये वाढ
◾️शहराच्या नाक्या नाक्यावर उभे असलेले रोड रोमियो करतात नजरेने अत्याचार
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून रोडरोमिओंच्या दहशती मुळे महिलांना घराबाहेर पडणे मुश्कीलीचे झाले आहे. मागणी तीन दिवसात बोईसर पोलिस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यातच शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारीकरण वाढलेल्या बोईसर शहरात महिला असुरक्षित असल्याने महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमली पदार्थ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आता महिला देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यातच शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली असुन पालक वर्ग चिंतेत आहेत. काही दिवसापूर्वी सालवड शिवाजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिग अत्याचाराची घटना घडली होती तर धोडीपूजा येथील एका लहान मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता. तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर आणि परीसरात लाखो कामगार राहत असून यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने बोईसर भागात गुन्हेगारीकरण झपाट्याने वाढत चालले आहे. बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नवीन वस्तीत राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीवर एका २४ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बोईसर भागात खळबळ उडाली होती. बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी ही विकृती संपुष्टात आलेली नाही.
बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील धनानी नगर, दांडीपाडा, गणेश नगर, काटकर पाडा, भैय्यापाडा,अवधनगर,आनंदी नगर, ओमसाई नगर, धोडीपूजा, सालवड शिवाजीनगर या भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये अनेक गावगुंड, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्री करणारे, सोनसाखळी चोर सारखे अट्टल गुन्हेगार राहतात. तारापूर औद्योगिक क्षेत्र लगत असलेल्या गंगोत्री मैदान व त्याठिकाणी असलेल्या पडीत इमारती परिसरात देखील चर्सी तरूण गर्दूल्ले याठिकाणी दिवसभर असतात. त्यातच शहरातील विविध शाळा-कॉलेजेस आणि क्लासेसचा परीसर, एसटी बस डेपो परीसर, ओस्तवाल ड्रीम हाऊस, गोकुळ स्वीट कॉर्नर, यशपद्मा बैठक कॅफे, साईबाबा मंदीर, नवापूर नाका, यशवंतसृष्टी, चित्रालय परीसर, रेल्वे ट्रॅकनजीकची झोपडपट्टी, परमीट बार, पानटपटर्या आणि पडीक जागा या ठिकाणी रोडरोमिओ, गावगुंड, ड्रगिस्ट, चरशी, गांजाफूके, दारुडे, गर्दूल्ले यांचा दिवस-रात्र अड्डा जमत आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या महीला, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनी आणि बाजारात खेरेदीसाठी येणार्या महीला यांची छेडछाड, अश्लील हावभाव, घाणेरड्या कमेंटस करून महिलांना लज्जास्पद वाटणारे कृत्य या टोळक्यांन कडून केले जात आहे.
◾️गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बोईसर पोलिस कमी पडत असल्याची भावना नागरीकांमध्ये असून गर्दीच्या ठिकाणी तसेच गावगुंड आणि रोडरोमियोंच्या नेहमीच्या अड्ड्यावर साध्या वेशातील पोलीसांनी नियमीत गस्त घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अट्टल गुडांचे आश्रयस्थान असलेल्या संशयीत जागांवर वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन करून आपला धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोईसर मध्ये वाढलेली गुन्हेगारी व रोडरोमिओंच्या दहशती मुळे संध्याकाळ नंतर महीला आणि मुलींना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून बाहेर गेलेली आपली मुलगी सहीसलामत घरी परतेल का या चिंतेत पालकवर्ग आहे.
◾️संध्याकाळी झाल्यावर पोलिसांचे दिखाऊ सेल्फी
पालघर पोलिस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार पोलिसांना आपण तैनात असलेल्या भागाचे सेल्फी फोटो व लोकेशन विशिष्ट पद्धतीने अँपवर टाकावे लागते. बोईसर शहरात देखील मुख्य बाजारपेठ, पोलिस चौक्या, तपासणी नाके अशा अनेक ठिकाणी तैनात असलेले पोलिस सेल्फी फोटोची प्रक्रिया पार पाडून आपल्या कामाचा पुरावा सादर करतात. दिवसभर कुठेही भटकत असले तरी त्या पोलिसाला सायंकाळी ही फोटोची प्रक्रिया करण्यासाठी धावाधाव करत आपल्या बंदोबस्त असलेल्या ठिकाणी जाऊन करावी लागते. या मागचा उद्देश पोलिस अधीक्षक कार्यालयाचा चांगला असला तरी प्रत्येक्षात चित्र हे वेगळेच असल्याचे दिसून येते.