◾️बोईसर मध्ये पहाटेच्या वेळी व सायंकाळी ऐकू येतो अजानीचा आवाज
◾️ राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विरोधात दिलेल्या आदेशानंतर बोईसर मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: कर्कश आवाजाने सकाळी पहाटे पासून सुरू होणाऱ्या भोग्यांना खाली उतरविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशा नंतर पोलिस विभाग देखील कामाला लागला आहे. बोईसर मध्ये याबाबत बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. प्रार्थना स्थळावर असलेल्या भोग्यांची परवानगी शिवाय भोंगे वाजवु नये असे पोलिसांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मशिदी समोर हनुमान चालीसा लावु नये याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात अनेक भागात बेकायदेशीर मदरसा व मशिदी देखील उभ्या राहिल्या आहेत. यातच यावर लावलेल्या भोंग्यावर पहाटे पासुनच अजानाचा येणारा कर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र हिंदू मुस्लिम हा वाद होऊ नये यासाठी अनेकांनी याबाबत कोणतेही व्यक्तव्य आजवर केलेले नाही. यातच गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर पणे वाजणाऱ्या भोंग्यावर स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांनी देखील दुर्लक्ष केले होते. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेकायदेशीर वाजणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतल्यानंतर देशभर भोंग्याचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे यांच्या भुमिकेचे सर्वसामान्य नागरिकांनी देखील दबक्या आवाजात का होईना स्वागत केले असून आता 4 मे रोजी देशभर अजानाच्या आवाजाला हनुमान चालीसाने उत्तर देणार असल्याचे जाहीर केलेले आहे. यामुळे सर्व ठिकाणी शांतता राहावी यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
बोईसर पोलिसांन कडून बेकायदेशीर भोंग्यावर आजुन कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याचे समोर आले आहे. यातच मंगळवारी 3 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बोईसर पदाधिकारी यांना बोईसर पोलिस ठाण्यात बोलविण्यात आलेले होते. अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी याबाबत मनसेच्या पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेवु नये तसेच शांतता राखावी याबाबत आवाहन करण्यात आले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून जर कोणी भोंग्यावर अजान सुरू केली तर आम्ही हनुमान चालीसा वाजवु असे मनसेचे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी यांनी पालघर दर्पणला माहिती देताना सांगितले आहे. यातच बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांच्या कडे देखील मनसेच्या पदाधिकारी यांना बोलविण्यात आले होते. यावेळी मुस्लिम समाजातील नेते मंडळी देखील उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांप्रमाणे लाऊडस्पीकरची कायदेशीर पणे परवानगी घेवून अजान केली जाईल असे मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्तींन कडून सांगितले असल्याचे समोर आले आहे.
◾️सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 ते सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येत नाही. यातच मधल्या काळात लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असते. यातच नागरी वस्ती असलेल्या भागात 40 ते 45 डेसिबल इतक्याच आवाजाची मर्यादा असते.
◾️ बोईसर मध्ये दोनच मशिदी कायदेशीर; इतर मात्र बेकायदेशीर?
बोईसर पोलिस ठाण्याच्या नोंदी नुसार बोईसर मध्ये दोनच मशिदीचा उल्लेख असुन इतर 8 ते 10 मशिदी व मदरशा चा कुठेही उल्लेख नसल्याचे मनसे कडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे साधारण 10 ठिकाणी बेकायदेशीर भोंगे लावण्यात आले असुन ते पोलिस उतरवणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितले आहे.
◾️ कोणत्याही धार्मिक प्रार्थना स्थळांची नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्या कडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. ज्या प्रार्थना स्थळाची नोंदणी केलेली नाही अशी प्रार्थाना स्थळे कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतात. यामुळे बोईसर मध्ये मशिदी किती नोंदणीकृत आहेत याबाबत पोलिसांनी तपासणी करण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे जी मशिदी धर्मादाय आयुक्त कडे नोंदणीकृत असतील अशाच मशिदींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लाऊडस्पीकर परवानगी देता येणार आहे.
◾️ मदरशामध्ये भोंग्यांची गरजच काय?
बोईसर भागात बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या मदरशा मध्ये देखील भोंगे लावण्यात आले आहेत. याठिकाणी लावण्यात आलेल्या भोंग्यांची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. यातच मदरशामध्ये मुस्लिम मुलांना शिक्षण दिलेले जात असेल तर त्याठिकाणी बेकायदेशीर पणे भोंगे लावण्याची आवश्यकता कशाला हा प्रश्न उपस्थित राहत आहे.
◾️4 मे पासून सर्वांनी नियम पाळावे, आम्ही ही सहकार्यच करू. मुद्दाम कोणी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये.
—- समिर मोरे, जिल्हा अध्यक्ष मनसे