◾️तारापूर पोलिस ठाणे हद्दीतील कुडण गावातील गंभीर घटना; मारहाण करून आगीत ढकलल्याने भाजून एक गंभीर जखमी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यातील कुडण गावात एक धक्कादायक प्रकार घडला असुन शेजारी राहणाऱ्या इसमांनी एकाला मारहाण करून त्याला आगीत ढकलून दिले आहे. आगीत पडल्याने त्याच्या हाताला व पायाला भाजुन गंभीर दुखापत झाली असुन त्यांच्या पाठीवर देखील मारहाण केल्याचे दिसून येते. असे असले तरी तारापूर पोलिसांनी घटनेचे गांर्भीय लक्षात न घेताच सौम्य प्रकारचे कलम लावुन आरोपीला मोकाट सोडल्याचा प्रकार घडला आहे.
तारापूर पोलिस ठाणे हद्दीतील कुडण गावात राहणारे राजेश महादेव किणी यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी 3 मे रोजी राजेश यांच्या कंपाऊंड लगत झाडाचा पालापाचोळा पेटवला होता. यामुळे त्या आगीची झळ त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना देखील लागत असल्याने राजेश किणी यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्यांना येथे आग पेटवु नका असे सांगत विरोध केला. यावेळी शेजारी राहणारे मोहन म्हात्रे व त्यांचा मुलगा सन्नी म्हात्रे यांनी राजेश किणी व आणखी एकाने यांना शिवीगाळ करत दमदाटी देत मारहाण सुरू केली. राजेश किणी यांना बेदम मारहाण केल्यानंतर पालापाचोळ्याला लागलेल्या आगीत मोहन म्हात्रे व त्यांच्या मुलांने राजेश यांना आगीत ढकलून दिले असल्याची गंभीर घटना 3 मे रोजी सायंकाळी 6:20 च्या सुमारास घडली आहे. या मध्ये राजेश किणी गंभीर जखमी झाले असून गेल्या तिन दिवसांपासून त्यांच्यावर बोईसर येथील शगुन हाँस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
गंभीर दुखापत होण्याच्या उद्देशाने राजेश किणी यांना मारहाण करणारे मोहन म्हात्रे हे एका साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक असल्याने पोलीस दबावाखाली या गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नसल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांन कडून केला जात आहे. यातच आगी भाजुन राजेश किणी यांच्या हाताला व पायाला गंभीर जखमा असुन त्यांच्या पाठीवर व इतर ठिकाणी देखील मारहाण केल्याच्या खुना दिसून येतात. राजेश किणी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी त्यांचे भाऊ हितेंद्र किणी हे घरी आल्यावर आपल्या चारचाकी मध्ये रुग्णालयात नेण्यासाठी गाडीत बसवत असताना मोहन म्हात्रे व त्यांचा मुलगा सन्नी म्हात्रे यांनी हितेंद्र किणी यांना देखील ठोश्या बुक्याने मारहाण केली आहे. याबाबत तारापूर पोलिस ठाण्यात गुन्हा सौम्य कलम लावुन नोंद केला असुन आरोपींना आजूनही ताब्यात घेतलेले नाही.
◾️राजेश किणी यांना त्यांच्या भावाने उपचारासाठी तारापूर येथील रुग्णालयात रात्रीच्या वेळी नेण्यात आले. यावेळी तारापूर सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यासाठी दिड तासाचा अवधी लागला. यावेळी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून तारापूर पोलिसांना भाजुन जखमी झालेल्या राजेश किणी यांच्या बाबत माहिती देण्यात आली होती त्यानंतर आरोग्य केंद्रात पोलिस देखील येवून गेले होते. 3 मे रोजी रात्री 10 वाजता बोईसर येथील शगुन हाँस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
◾️आपल्या भावावर योग्य उपचार सुरू झाल्यानंतर हितेंद्र किणी व त्यांचे कुटुंबातील काही लोक मोहन म्हात्रे व इतरांवर तक्रार दाखल करण्यासाठी रात्री 12 वाजताच्या सुमारास तारापूर पोलिस ठाण्यात गेले होते. यानंतर 4 मे रोजी पहाटे 4 वाजता गुन्हा नोंद झाल्या बाबत कागदपत्रे देण्यात आली. गंभीर गुन्ह्यात सौम्य कलम लावल्याबाबत पोलिसांना फिर्यादी यांनी विचारणा केली असता डाँक्टरांचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करू असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
◾️तारापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व दुखापत झालेल्या राजेश किणी यांचा जबाब घेण्यासाठी कोणीही पोलिस हाँस्पिटल मध्ये 5 मे रोजी रात्री उशिरापर्यंत फिरकला नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
◾️तारापूर पोलीस ठाण्यातुन एक पोलिस कर्मचारी 4 मे रोजी बोईसर येथील शगुन रुग्णालयात उपचार घेत असलेले राजेश किणी यांच्यावर सुरू असलेले उपचार व त्यांना झालेली दुखापत याबाबत अहवाल घेण्यासाठी आले होते. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी यांनी अहवाल देण्यासाठी 10 मिनिटे त्यांनी थांबण्याची विनंती केली. यावेळी उर्मट असलेल्या पोलिसांने त्यांना बेजबाबदार पणे उत्तर देत मला वेळ नाही थांबायला असे सांगुन त्याठिकाणाहुन निघून गेले.
◾️आपल्यावर अन्याय होऊन देखील पोलिस त्याकडे गांर्भीयांने लक्ष ते नसल्याने नातेवाईकांनी स्वतः 4 मे रोजी रात्री उशिरा तारापूर पोलिस ठाण्यात जावुन डाँक्टरांनी दिलेला उपचाराचा अहवाल सादर केला.
◾️एका इसमाला गंभीर दुखापत होण्याच्या दृष्टीने झालेली मारहाण व पोलिस त्याकडे करत असलेले दुर्लक्ष याबाबत पोलिसांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, घटनेचा तपास योग्य पद्धतीने करत असून डाँक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.