◾️विराज स्टील कंपनी मालकावर कारवाई करावी – हुसेन दलवाई
◾️शेकडो कामगारांवर गुन्हे दाखल झाले असले तरी मुख्य चिथावणी करणारे फिरतात खुलेपणाने
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या तारापूर येथील विराज प्रोफाइल कारखान्यातील कामगार आक्रमक झाले आणि तोडफोड दगडफेक झाली अशी घटना घडल्याने शेकडो कामगारांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र ही घटना कोणी घडवली याबाबत अद्यापही बोईसर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली नसुन विराज प्रोफाइल कडून भाडोत्री गावगुंडांचा उभा केलेला फौजफाटा हा खुप काही सांगुन जात आहे.
यातच मालक, भाडोत्री गुंड व पोलीस मिळून कामगारांवर हल्ला केलाचा आरोप हुसेन दलवाई यांनी केल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाईल या पोलाद निर्मित कारखान्यामध्ये मुंबई लेबर युनियनची स्थापन झाली होती. मात्र कारखान्यांचे मालक निरज कोच्चर यांनी या कामगार संघटनेला विरोध करत आपल्या राजकीय पुढाऱ्यांना हाताशी घेवून कंपनी मालकांने आणखी एक कामगार संघटना याठिकाणी स्थापन केली. मुंबई लेबर युनियनचे गेल्या दोन तिन महिन्यापासून अनेकदा शांततेच्या मार्गांने कारखान्याच्या गेटवर आंदोलने करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी कामगारांवर दबाव टाकण्यासाठी कंपनी मालक बोईसर पोलिस ठाण्याचा फौजफाटा बोलवून घेत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी छावणीचे स्वरूप आणुन दहशत निर्माण करण्याचे काम कंपनी करत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. मात्र अचानक याठिकाणी कामगार आक्रमक का झाले याबाबत तपास पोलिसांनी केला का हा सवाल उपस्थित होत आहे. यातच कामगारांना चिथावण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते स्थानिक नेते व गावगुंड अद्यापही मोकाट फिरत आहेत.
कारखानदारच्या दडपशाही विरोधात कामगार संघटनेचा संप 16 मे पासून सुरू होणार होता. मात्र त्या अगोदरच कंपनी व्यवस्थापकांने ठेकेदार पध्दतीने नवीन कामगार भरती सुरू केली होती. यासाठी बोईसर येथील राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांना सोबत घेण्यात आले होते. बेटेगाव व खैरापाडा येथील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांना सोबत घेवून गावगुंडांची फौज विराज कंपनीच्या मालकांने जमा केली होती. विराज प्रोफाइल कारखान्यात कामगारांवर दहशत निर्माण करण्यासाठी निरज कोच्चर यांने बेटेगाव येथील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी संदीप नामक व्यक्तीला ही जबाबदारी सोपवली होती. यांच्या सोबत खैरापाडा येथील विवेक व बोईसर मधील पाटील देखील सक्रिय पणे निरज कोच्चर यांच्या सोबत उभे होते. विशेष म्हणजे वाडा येथे गावकऱ्यांचा विराजच्या नवीन प्रकल्पाला विरोध असल्याने त्याठिकाणी देखील गावगुंडांची फौज घेवून जाण्याची जबाबदारी देखील निरज कोच्चर यांनी यांच संदीप वर दिलेली आहे. यामुळे कारखान्यात झालेला हिंसाचार यामध्ये या तिन्ही त्रिकुटांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेल्या बोईसर मध्ये येथील पोलिस अधिकारी अशा गावगुंडांना राजकीय पाठबळामुळे मोकाट सोडणार की त्यांना कायद्याच्या चौकटीत आणणार हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.
◾️काय मागणी केली हुसेन दलवाई यांनी गृहमंत्र्यांन कडे
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज स्टील या कंपनीत मालक व कामगार संघर्ष सुरू आहे मुंबई लेबर युनियन ही अधिकृत कामगार संघटना असूनही व्यवस्थापनाने अतिरिक्त कामगार संघटना स्थापन केल्याने या संघर्षाचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. बोलणी करून कामगारांचे प्रश्न सोडविणे गरजेचे असताना कंपनीचे मालक निरज कोचर तयार नसून कामगारांचे विरोधात गुंडगिरी व दडपशाही करत आहेत. याची दखल गृह खात्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी कंपनीला कायदेशी संपाची नोटीस देण्यात येऊन सोळा मेपासून हा संप सुरू होणार होता मात्र त्याआधीच मालक व गुंडांनी मिळून ठेकेदारी पद्धतीने कामगार कंपनीत भरती करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यास कामगारांनी विरोध दर्शविला होता यावेळेस मालकाने कारखान्याच्या गेटवर 100 च्या आसपास बाऊसर सुद्धा तैनात केले होते. बेकायदेशीर रित्या भरती करण्याचा प्रयत्न सुरू असताना कामगारांनी विरोध दर्शविला त्यामुळे मालक, मालकाचे भाडोत्री गुंड, पोलीस मिळून कामगारांवर हल्ला करून संघर्ष व दहशत निर्माण केली असेही दलवाई यांनी पत्रात नमूद केले आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस व मालक यांची बैठक होऊन बैठकीत संगनमत होऊ दहशत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सदर कार्यक्रम आखण्यात आल्याचा आरोपही दलवाई यांनी निवेदनात नमूद केला आहे.
कामगार आपल्या न्याय हक्कासाठी संपाच्या माध्यमातून लढा देत असताना निराधार व शस्त्रहीन कामगारांना पोलिसांनी मदत करणे अपेक्षित असताना पोलीस हे कंपनी मालकांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. सरकार पुरोगामी व गोरगरिबांच्या आहे याची प्रचिती यावी या करीत लवकरात लवकर कामगारांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व मालकावर कारवाई करण्यात यावी व कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी दलवाई यांनी गृहराज्यमंत्री यांच्याकडे केली आहे.