◾️ ड्रग्स माफिया निलेश सुर्वे सह अन्य आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांची विशेष कामगिरी
◾️ मारहाण झालेल्या तरूणांची फिर्याद घेण्यासाठी बोईसर पोलिसांनी केली होती टाळाटाळ
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: शहरात ड्रग्स माफियांनी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असुन तुरुंगातुन सुटून आलेल्या माफियांने एका तरूणांला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भंडार वाडा येथील राहणाऱ्या काही स्थानिकांनी एकत्र येवून ड्रग्स माफिया विरोधात तक्रार बोईसर पोलिसांना दिली होती. या तक्रारी चा राग मनात धरून यातील एका तक्रारदारावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर दुखापत पोचवल्याची गंभीर घटना बोईसर मध्ये घडली आहे.
बोईसर शहरात ड्रग्स माफिया सक्रिय झाल्यांने भंडारवाडा येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी अधिकारी यांच्या कडे 8 जुलै 2021 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारी मध्ये बोईसर पोलिसांनी बनावट पंचनामा करून हा तक्रारी अर्ज निकाली काढला होता. याबाबत पालघर दर्पणने सातत्याने पाठपुरावा करून बोईसर पोलिसांचे कारनामे उघड केले होते. याच तक्रारी अर्जाचा राग मनात धरून ड्रग्स माफिया निलेश सुर्वे व त्यांच्या साथीदारांनी मंगळवारी 17 मे 2022 मधुर हाँटेल समोरून 3:30 वाजताच्या सुमारास तक्रारदार मुबारक खान याला दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर अडवून बेदम मारहाण सुरू केली होती. जमीनीवर पाडून लाथा बुक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. येवढ्यावरच न थांबता मुबारक खान याला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याला यशवंतसृष्टी येथे रेल्वे धक्या जवळ असलेल्या साईबाबा मंदिर ज्याभागात अमली पदार्थ विक्री व सेवन केले जाते याठिकाणी घेऊन गेले. याठिकाणी पुन्हा मारहाण करून सायंकाळी पर्यंत डांबून ठेवले होते. येथून या जखमी युवकांने आपला जीव वाचवत येथून पळ काढला आणि आपल्या मित्रांच्या घरी जाऊन त्याच्या सोबत थेट बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी 7:30 वाजताच्या दरम्यान आला होता.
बोईसर पोलिस ठाण्यात तैनात असलेले ठाणे अंमलदार धनु यांनी व एका महिला कर्मचारी यांनी या जखमी तरूणांची तक्रार घेण्यासाठी थांबवून ठेवले. एनसीआर घेवु असे सांगत गुन्हा दाखल करण्यासाठी नकार दर्शविला होता. हा गंभीर प्रकार याठिकाणी उपस्थित असलेले पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत कायदेशीर भाषेत विचारल्यानंतर ठाणे अंमलदार यांनी वैद्यकीय उपचारासाठी पत्र दिले आणि डाँक्टरांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले. यावेळी जखमी असलेल्या तरूणांला हेमेंद्र पाटील यांनी आपल्या गाडीतून उपचारासाठी टिमा येथील बोईसर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डाँक्टरांनी केलेल्या तपासणी मध्ये मुबारक खान याच्या डोक्यावर, दोन्ही डोळ्यात, छातीवर, पाठीवर, हातावर गंभीर दुखापत झाली असल्याचे दिसून आले. यातच त्यांच्या पायावर लाकडी दांडक्यांने जोरदार मारहाण केल्याचे दिसून आले आहे. डाँक्टरांन कडून उपचार केल्यानंतर मुबारक खान तक्रार देण्यासाठी बोईसर पोलिस ठाण्यात रात्री साधारण 10 वाजता दाखल झाला. यावेळी येथे उपस्थित असलेले ठाणे अंमलदार माळी व एक महिला कर्मचारी यांनी तक्रार आता नको सकाळी दाखल करायला या असे सांगत चालढकल केली. यावेळी पत्रकारांनी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या निदर्शनास हा प्रकार आणुन दिल्यानंतर तक्रार घेतली जाईल असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंखे यांनी तक्रारदार याला “तुम तक्रार देंगे तो तुमको और तकलीप हो सकती है किसके लिए इनके नाद मे लगते हो” असे सांगत किरकोळ गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने काय प्रकार घडला तो कागदावर लिहुन दे असे सांगण्यात आले होते.
एका मुस्लिम तरुणांला बेदम मारहाण करण्यासाठी साधारण 20 लोकांनी त्याला घेरून मारहाण करून एकप्रकारे जिवेठार मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला असताना देखील बोईसर पोलीस हे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत होते. याबाबत रात्री 12:30 वाजाता पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांनी पोलिस उपअधिक्षक तथा उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा यांना मोबाईल वर संदेश पाठवून याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली होती. तसेच आपल्यावर होत असलेला अन्याय यासाठी तक्रारदार यांच्या नातेवाईकांनी दुसरा दिवस उलटून जात असताना 18 मे 2022 रोजी पहाटे 1 वाजता पालघर पोलिस कंट्रोल रूमला बोईसर पोलीस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पालघर पोलिस कंट्रोल रूम मधुन बोईसर पोलिसांना संपर्क साधला असता बोईसर पोलिसांचा दुरध्वनी बंद होता. यामुळे पुन्हा पालघर कंट्रोल रूम मधील कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना फोन करून बोईसर पोलिसांना फोन देण्यासाठी सांगितले. यावेळी येथील एका महिला पोलिस कर्मचारी यांनी कंट्रोल रूम सोबत बोलण झाल्यावर त्याचा राग तक्रारदार यांच्या वर काढत कंट्रोल रूमला फोन का केला अशी विचारणा केली. महत्त्वाचे म्हणजे मोबाईलवर टाईमपास करत असताना मात्र तक्रार घेण्यासाठी वेळकाढू पणा करत असल्याचा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेला असेलच.
बोईसर पोलिस ठाण्यात सर्व नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच पहाटे 1: 30 मिनिटांनी तक्रारदार यांची फिर्याद नोंद करणे सुरू केली. यातच यावेळी नेमका प्रकार कशामुळे घडला व मारहाण का झाली याबाबत फिर्यादी सांगत असताना देखील याबाबत उल्लेख टाळण्यात आला होता. यातच यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंखे हे स्वतः ठाणे अंमलदार यांच्या बाजूला होते. 18 मे रोजी पहाटे 5: 23 वाजता माया उर्फ मयंक काठे, सोनु, विनोद माने, सुभाष पाटील, निलेश सुर्वे, दिपक, अन्या, काळु व इतर 10 ते 12 अनोळखी इसमांवर बोईसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड सहिता 1860 प्रमाणे कलम 394,364 अ, 143, 144, 149, 324, 323 व 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◾️ बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधिक्षक नित्यानंद झा यांना 18 मे रोजी सकाळी या गंभीर प्रकाराबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाचा तपास आपल्या कडे घेतला. तसेच फिर्यादी यांना घेवून घटनास्थळी पाहणी करून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असता ही घटना सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेली आहे. याबाबत तपासाची चक्रे फिरवून तातडीने निलेश सुर्वे, सोनु भोसले, विनोद माने, अन्या, काळु अशा आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.