◾️बॉयलरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला; भिषण आगीत 10 पेक्षा जास्त स्फोट
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी मध्ये वसलेल्या कंपनीत मंगळवरी रात्री उशिरा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. कंपनीला आग लागल्याची बातमी समजताच बोईसर एमआयडीसी पोलिस व अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यादरम्यान सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
एमाआयडीसी मधील प्रीमियर इंटरमिडीयेट प्रा. लि. टी-57 मध्ये स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली आहे. साधारण ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास बॉयलर मध्ये स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. अशी प्रथम माहिती समोर येत आहे. बॉयलरचा पहिला स्फोट झाल्या नंतर या कंपनीमध्ये सलग एका मागून एक असे १० पेक्षा अधिक स्फोट झाले. यामुळे कंपनीला भीषण आग लागली. या स्फोटाची तीव्रता भयानक होती जवळ पास ८ किलो मिटर पर्यंतचा परिसर हादरला. जवळपास ३ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीमुळे झालेल्या वित्त हानी बाबतची अधिकृत माहिती अस्पष्ट असली तरीही कंपनीला मोठी आर्थिक हानी झाली असल्याची शक्यता येथील कर्मचाऱ्यांकडून दर्शवली जात आहे. त्याच बरोबर आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे टी (झोन) परिसरात धुराचे लोट पसरले असुन स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तसेच परिसर हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झालेले होते.