◾️ पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष एकनाथ शिंदेंच्या विरोधात?
◾️पक्षाकडून कारवाई होऊनये यासाठी विरोधात जाण्याचा दाखवला होता आभास?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: एकनाथ शिंदे यांचे आशिर्वाद मिळावे यासाठी सदैव ठाण्याच्या वाऱ्या करणाऱ्या आणि त्यांच्याच आशिर्वादाने जिल्हापरिषद अध्यक्षपद मिळविलेल्या पालघर जिल्हा परिषद अध्यक्षाने आता मात्र त्यांच्याच विरोधात भूमिका घेतल्याचे पालघर मध्ये झालेल्या आंदोलनात पहावयास मिळाले. काही दिवसापूर्वी पालघर शहरात केलेल्या बंडखोर आमदार व एकनाथ शिंदे यांच्या विरोधात चाललेल्या घोषणाबाजी वेळी स्टेजवर जिल्हा परिषद अध्यक्ष आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले होते.
आपले राजकीय भवितव्य अबाधित राहावे यासाठी ठाण्याचे उंबरठे झिजविल्यानंतर पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदी काही स्थानिकांचा विरोध असताना देखील एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदी वैदही वाढाण यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद बहाल केले. आपले स्वप्न साकार झाल्यावर वाढाण यांनी ठाण्यात जावून एकनाथ शिंदे यांच्या समोर नतमस्तकही झाल्या. मुंबई येथून डावलण्यात आलेल्यांना एकनाथ शिंदे हाच एक पर्याय उपलब्ध होता. राजकीय असे कोणतेही पाठबळ नसताना अशा अनेकांना एकनाथ शिंदे यांनी सर्वोतोपरी मदत करून अपेक्षा पेक्षा जास्त मोठे केल्याचे अनेक वेळा दिसून आले होते. महत्त्वाचे म्हणजे मोठमोठी पदे दिली असली तरी अशा लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनावर आपला दबदबा राखण्यासाठी अतिशय कमी पडल्याचे दिसून आले आहे. मात्र ठाण्यावरून शिंदुर फासून आलेल्या पदाधिकाऱ्यांना येथील शिवसैनिक सर्वांना आपलेसे करून घेतात ही आजवरची पद्धत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जात 39 आमदारांनी बंडखोरी करत आपला गट मजबूत केला. यावेळी पालघर मधील काही भागात पक्षांच्या विरोधात काम करणारे व बाजूला सारले गेलेले अनेक नेते आंदोलना दरम्यान अचानक जागे झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटा विरोधात काही तासाचे आंदोलन सुरू केले होते. याच वेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण देखील एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलनात सहभागी असल्याचे दिसून आल्या. पक्षाचा आदेश असल्याने त्यांना देखील आपल्या राजकीय कारकिर्दीची चिंता भासत असल्याने त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला की, खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्या उभ्या राहिल्या? हे काही काळातच उघड होणार आहे. एकिकडे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवायची की उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आणि आपले राजकीय भवितव्य बदलून दिले त्यां मुख्यमंत्री शिंदे साहेबा सोबत राहायाचे अश्या द्विधा मनस्थितीचा, अडचणीचा प्रश्न तर निर्माण झाला नाही ना? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
◾️पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे भक्कम, शिवसैनिकांच्या मनात श्रद्धा असलेले असे नेतृत्व नाही. ठाण्याहून एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने येथील ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद निवडणूक लढवली जाते. शिंदे यांच्या मदतीशिवाय याठिकाणी एक निवडणूक देखील पारपडणे अशक्य असल्याने येणाऱ्या काळात येथील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यावर कोणतेही आश्चर्य वाटायला नको. परंतु जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली असून त्यांचे लक्ष 12जुलै च्या निर्णयाकडे आहे. परंतु जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांच्या मनात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद यांचे अढळस्थान अभाधित आहे.