◾️कोणी विरोधात तर कोणी मुख्यमंत्री होताच आले समर्थनास
◾️हेमेंद्र पाटील
सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्ता सोडाच परंतु आमदारांना देखील शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तासंतास वर्षा बाहेर उभे राहणाऱ्या आमदारांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि काही दिवसातच उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. विधानपरिषद निवडणुकीत मतदान केल्यावर अचानक गायब झालेले आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत मध्ये असल्याचे दिसून आले. यानंतर आसामच्या गुवाहाटी मध्ये आमदारांना नेण्यात आले आणि संपूर्ण देशाचे लक्ष हिंदूत्वासाठी बंड केलेल्या आमदारांच्या कडे लागले होते.
शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या अनेक मंत्र्यांनी अचानक गुवाहाटी गाठली आणि ते देखील शिंदे यांच्या गटात दाखल झाले. याचवेळी सर्व घडामोडी सबंध महाराष्ट्रा बरोबरच जगाने देखील पाहिल्या आहेत. याच दरम्यान मुंबई मध्ये देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपले शक्तीप्रदर्शन देखील केले. यातच पालघर जिल्ह्यात एकाही नेत्यांने विरोधाचा आवाज काढलेला नव्हता. “वेट अँन्ड वाँच” च्या भुमिकेत येथील नेते होते. विधानसभा निवडणुकीत व इतर वेळी पक्षाच्या विरोधात काम केल्याने एकनाथ शिंदे यांनी ज्यांना बाजूला सारले होते ते अचानक जागे झाले आणि त्यांनी मातोश्री सह सेना भवन गाठले आणि दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन देखील उभे केले होते. याच दरम्यान पालघर येथे झालेल्या आंदोलनात महामंडळ अध्यक्षा जोती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, उत्तम पिंपळे, वैभव संखे, केतन पाटील, प्रभाकर राऊळ अशी मोठी फौज उभी होती.
बोईसर येथील शिवसेना माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ देखील एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रभाकर राऊळ यांनी त्यांच्या शुभेच्छाचे फलक सबंध बोईसर भागात लावले. महत्त्वाचे म्हणजे बोईसर पालघर विधानसभा आपल्या पदरात पडावी यासाठी ठाण्याहून पालघर जिल्ह्यात आलेल्या डॉ. विश्वास वळवी यांचे समर्थक असलेल्या नरेश धोडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बोईसर भागात मोठमोठे फलक लावले होते. याचवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या सह एकनाथ शिंदे यांचा फोटो छापण्यात आला होते. या फलकावर शिवसेनेचे जगदीश धोडी यांच्या सोबत असलेल्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर काळे फासले, तसेच माजी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे यांनी देखील स्वतः एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर काळे फासत आंदोलन केले. बोईसर मध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचे समर्थक आक्रमक होऊन शिवसेनेचे जगदीश धोडी यांचे छायाचित्र पायाखाली टाकून त्यावर लाथा मारत खुलेआम जगदीश धोडी यांना चेतावणी दिल्याचे दिसून आले होते.
तारापूर जिल्हा परिषदेवर स्थानिकांना डावलून एकनाथ शिंदे यांनी प्रकाश निकम यांचे पुर्नवसन केले होते. मात्र त्यांनी देखील या घडामोडी मध्ये दुर राहुनच जेव्हा काही निर्णय होईल तेव्हा पुढे येवु अशी भुमिका घेतली होती. त्यांच्या व्हाट्सएप डिपीवर अचानक आनंद दिघे यांचा फोटो आल्यावर त्यांना आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याबाबत विचारले असता त्यांनी अतिशय हुशारीने राजकीय उत्तर दिले होते. असे सर्व असले तरी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या विरोधात असलेला नाराजीचा सुर पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात कमी झालेला दिसून आलेला आहे. बोईसर भागात तर शिवसेनेचे शहर प्रमुख मुकेश पाटील यांनी आपल्या सन ग्रुप च्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे फलक लावले आहेत. यातच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रभाकर राऊळ यांनी वर्षभरापूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणून त्यांचा पुतळा जाळणारे बोईसर मधील शिवसेनेचे निलम संखे हे काही दिवसापुर्वी शिवसेना भवनात गेले होते. एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थ ओळखले जाणारे निलम संखे मात्र अद्यापही यासर्व नाट्यमय घडामोडी पासून दुर असल्याचे दिसत असले तरी वेळ पाहून भुमिका ठरविणार का हे पाहणेच महत्त्वाचे आहे.
पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभे राहिलेले काही नेत्यांनी हळूहळू माघार घेण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येते आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपला गट हिच खरी शिवसेना असा दावा केल्यानंतर आता स्थानिक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यातच महत्त्वाचे म्हणजे शिंदे यांच्या समर्थनार्थ अनेक नवीन कार्यकर्ते समोर येत आहेत. कधीही शिवसेना मध्ये नसलेले सर्वसामान्य नागरिक देखील समर्थनार्थ पुढे येत असल्याने नवीन समर्थक आले आणि शिंदे यांच्या शिवसेना मध्ये सहभागी झाले तर आपली कारकीर्द संपेल अशी मनात भिती येथील नेत्यांन मध्ये निर्माण झाली आहे. बोईसर शहरात तर शिवसेना नेत्यांची चार बाजूला असलेली तोंडे व नवीन येणाऱ्यांना डावलण्याचे काम करणारे नेते सद्या ‘ना ठाकरेंच्या पक्षा सोबत ना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना’ सोबत अश्या स्थितीत असल्याने याच वेळी मात्र शिंदे यांचे समर्थक मात्र बोईसर मध्ये वाढत चालले असल्याने येथील वर्षानुवर्षे प्रस्थापित असलेल्या नेत्यांना आता आपल्या ग्रामपंचायत वार्ड पर्यंतच अबाधित राहतात का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळातच बोईसर सह संपूर्ण पालघर जिल्ह्यात शिंदे यांचा प्रभाव वाढलेला दिसून येणार असल्याची चिन्हे दिसू येत आहेत.