जनजागृतीच्या नावाखाली राजकीय मंडळींनी केली ५० पेक्षा जास्त रोपांची नासाडी
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: बोईसर मध्ये काही दिवसांपूर्वी रोपटे वाटप कार्यक्रम काही राजकीय मंडळींकडून राबवण्यात आला होता. मात्र या रोपटे वाटप कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. या कार्यक्रमा दरम्यान नागरिकांना वाटण्यासाठी आणलेली रोपं बेफिकीरपणे त्याच ठिकाणी ओस्तवाल मध्ये फेकण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे राजकीय मंडळींकडून रोपटे वाटप कार्यक्रम हा निव्वळ देखावा असल्याचे चित्र आहे.
बोईसरमध्ये रोपट वाटप कार्यक्रमा दरम्यान अनेक नागरिकांना रोपं वाटण्यात आली मात्र उरलेली बरीचशी वेगवेगळ्या प्रकारची रोपं ओस्तवाल येथील पिंकसिटी जवळ दुरावस्थेत पडलेली आहेत. पिंकसिटीच्या शेजारी जवळपास ५० पेक्षा जास्त रोपं असुन ही रोपं गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पडलेली आहेत. या बाबत पर्यावरप्रेमीं कडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बोईसर मध्ये राजकीय मंडळींनी ज्या पद्धतीने कार्यक्रम राबवला व बॅनरबाजी केली त्या तुलनेने रोपटे वाटप हा कार्यक्रम यशस्वी झालेला नाही.
रोपटे वाटप करून पर्यावरण संरक्षणासाठी मदत म्हणून तसेच जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवणे हा या कार्यक्रमाचा हेतू असला तरी या कार्यक्रमाचा हेतू साध्य झालेला नाही. रोपटे वाटप बरोबरच रोपांची जोपासना करणे हे देखील कार्यक्रम आयोजकांचे व तेथे उपस्थित असलेल्यांचे कर्तव्य होते. मात्र रोपांच्या नासाडीकडे आयोजकांनी फारसे गार्भियांने लक्ष दिले नाही. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान ५० पेक्षा जास्त रोपांची नासाडी झाल्याचे दिसून येत आहे.