◾️ पालघर मध्ये भूमिसेना व आदिवासी एकतापरिषदेचा कडून केला जातो भव्य कार्यक्रम; यंदाच्या 9 आँगस्ट मध्ये ठाण्याहुन राजकीय रंग आणण्यासाठी रसद ?
◾️स्थानिक आदिवासी संघटनेला जुगारून विश्वास वळवी यांच्या कडून आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर येथे आदिवासी एकतापरिषद व भुमिसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधव कार्यक्रमात सहभागी होतात. मात्र यंदा ठाण्याहून आलेल्या विश्वासने वेगळा कार्यक्रम आखत एकत्रित असलेल्या समाजबांधवांन मध्ये फुट पाडण्याचे काम करत राजकीय रंग आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून भुमिसेनेने असल्या राजकारण्यांच्या दिखाव्याला बळी पडू नका असे आवाहन समाज बांधवांना केले आहे.
आदिवासी एकता परिषद व भुमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळुराम धोदडे काका यांनी आपल्या मेहनतीने सर्वात मोठा आदिवासी दिनाचा कार्यक्रम व रँली आजवर पालघर मध्ये आयोजित केली आहे. यंदा देखील संपूर्ण जिल्ह्यात खेडोपाडी जावून जनजागृती करून आदिवासी समाजातील लोकांना एकत्रित कार्यक्रमाला येण्याचे आवाहन काळुराम काका यांनी केले. वयवृध्द नागरिकांन पासुन ते युवा पिडी देखील मोठ्या उत्साहात 9 आँगस्ट रोजी पालघर येथे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र यावर्षी ठाण्याहून आपले भवितव्य आजमविण्यासाठी आलेले विश्वास वळवी यांनी वेगळा कार्यक्रम पालघर मध्ये आयोजित केला असून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकार दरबारी आपले जिल्ह्यातील स्थान दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आदिवासी बांधवांन कडून केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व आदिवासी एकत्रित येवून कार्यक्रम घेत असताना यावेळी राजकीय खेळी खेळण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या ठाण्याच्या फाटकांच्या विश्वासला आता जोरदार विरोध होऊ लागला आहे. यातच आदिवासी दिना दिवशी कार्यक्रमाला राजकीय रंग देण्यासाठी रसद ठाण्याहून पुरविण्यात आली आहे का असा सवाल देखील उपस्थित राहत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विश्वास फाऊंडेशन म्हणजे विश्वास वळवी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची चर्चा पसरविण्यात आली होती. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शासकीय विभागाकडून आलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे समाजातील जेष्ठ नेत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला डावळून आपले राजकीय भविष्याव्य निर्माण करण्यासाठी केलेल्या केविलवाण्या प्रयत्नांना मुख्यमंत्री कितपत साथ देखील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळात विश्वास वळवी यांनी पारंपरिक पणे होणाऱ्या कार्यक्रमात एक आदिवासी म्हणून सहभागी होणे गरजेचे होते. मात्र आदिवासी एकता परिषद व भुमिसेनेच्या कार्यक्रमाला होणारी हजारोंच्या संख्येने गर्दी याच गर्दीचा आयता दिखावा करून घेण्याचा प्रयत्न ठाण्याच्या विश्वास यांच्या कडून केला जात असल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे विश्वास वळवी यांनी अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करून थेट आदिवासी संघटने बरोबरच काळूराम काकांना आव्हान देण्याचा एकप्रकारे प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याने यांचे पडसाद मात्र जिल्हा उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
◾️ 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी विश्वास वळवी यांनी पालघर जिल्ह्यात प्रवेश केला. यामध्ये बोईसर विधानसभा शिवसेना पक्षाकडून मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. आमदार रविंद्र फाटक व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थ असलेल्या विश्वासला पुढे करून ठाण्याच्या सुबेदारांनी बोईसर विधानसभा भागात उभी फुट पाडली असल्याचे राजकीय आरोप अनेकदा स्थानिकांनी केले आहेत.
◾️ नंदुरबार वाया ठाणे व थेट पुनर्वसन बोईसर विधानसभा असा हा प्रकार होता. मात्र स्थानिकांचा विरोध लक्षात घेता ठाण्याच्या सुबेदारांचा प्रयत्न अयशस्वी झाला. पालघर जिल्ह्यात अनेक आदिवासी नेते व नेतृत्व असताना देखील सर्वच पक्षांनी पालघर मध्ये बाहेरून आलेल्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना तर यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून आले होते.
◾️पालघर मध्ये विश्वास फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येणारा त्यांनी दावा केल्या प्रमाणे भव्य कार्यक्रम होणे याला बातमी म्हणून कोणताही विरोध नाही. परंतु पालघरच्या आदिवासी समाजात फुट पाडण्याचे कुटीर काम हे केले जात असल्याचा आरोप खुद्द समाजातील जानकारांनी केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात परकीयांचे पुर्नवसन करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांना येथील आदिवासी व इतर समाजातील भुमिपुत्र नक्कीच जशास तशी जागा दाखवतील असे समाज बांधवांन पालघर दर्पण सोबत बोलताना स्पष्ट सांगण्यात आले आहे.
◾️दोन वर्षांपूर्वी आलेल्या विश्वास वळवी यांना शिवसेना सरकार कडून आदिवासी एकात्मिक प्रकल्पाच्या सदस्य पदावर थेट वर्णी लागली. यावेळी शिवसेनेला एकही स्थानिक आदिवासी या पदासाठी योग्य वाटला नाही. याताच्या शिंदे सरकार कडून या विभागाच्या सर्व पदांना स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील विश्वास यांनी आपल्या नावा पुढे याच सदस्य पदाचा उल्लेख अनेकदा केल्याचे दिसून आले होते.
◾️जागतिक आदिवासी दिवसाला आता गौरव दिवस पुरता मर्यादित ठेवुन कार्यक्रम अधिक खर्चिक भव्यदिव्य करत सामान्य आदिवासीना दुर करण्याचे जाणीवपूर्वक षडयंत्र केले जात आहे. तरी, आदिवासी समाजातील समजदार, समाजाशी बांधिलकी असलेल्या, मरण पत्करेन पण शरण जाणार नाही ही बिरसा मुंडा यांची शिकवण मानणाऱ्या अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शेठ सावकार, दलाल, यांच्या विरोधात ठोस भूमिका घेऊन समाजाला दिशा देण्यासाठी,आपली संस्कृती जपण्यासाठी हा दिवस साजरा करूया.
— काळूराम धोदडे, संस्थापक अध्यक्ष आदिवासी एकतापरिषद व भूमिसेना
◾️ आम्ही कोणतीही वेळी रँली काढत नाही आम्ही फक्त जिल्हा मुख्यालय याठिकाणी काही सांकृतिक कार्यक्रम व समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी स्टेज उभारले आहे. माझ्या विश्वास फाउंडेशन या संस्थे मार्फत कार्यक्रमाचे आयोजन केले असुन याला कोणताही राजकीय रंग नाही. राजकारण करण्याची ही जागा नाही मी याठिकाणी राजकारण करत नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्वांन सोबत संवाद साधणार आहेत.
— डॉ. विश्वास वळवी, अध्यक्ष विश्वास फाउंडेशन