९ ऑगस्ट रोजी जनता दल ( सेक्युलर ) तर्फे महागाई आणि दडपशाही विरोधात ब्लॅक अँड व्हाईट निषेध मोहीम
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: भरमसाठ वाढणारी महागाई आणि सरकारी दडपशाही विरोधात जनता दल ( सेक्युलर ) तर्फे स्वातंत्र्य संग्रामातील चले जाव चळवळीच्या स्मृतिदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी ब्लॅक अँड व्हाईट निषेध मोहीम राबवली जाणार आहे. पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे, मुंबई महासचिव ज्योतिताई बडेकर, मुंबई सचिव लोकशाहीर संदेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमे अंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी सामान्य जनतेने काळी पांढरी वस्त्रे परिधान करावीत. ब्लॅक अँड व्हाईट डीपी ठेवावेत. आपल्या कामाच्या ठिकाणी,शाळा कॉलेज किंवा सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक तसेच सामूहिक ब्लॅक अँड व्हाईट फोटो / विडिओ काढून त्याखाली ‘ महागाई आणि दडपशाहीचा निषेध ‘ असं लिहून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला निषेध सरकारपर्यंत पोहोचवावा. असं आवाहन या मोहिमेच्या प्रमुख आणि पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योतिताई बडेकर यांनी केलं आहे.काळी पांढरी वस्त्रे उपलब्ध नसतील तर स्कार्फ,रिबीन,ओढणी,टोपी,टिळा आदींचा वापरही लोकं करू शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जनता दलाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे आणि प्रधान महासचिव प्रताप होगाडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुहास बने,मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली राज्याच्या उर्वरित भागातही जोरदार मोहीम राबवली जाणार असल्याचं रवि भिलाणे यांनी म्हटलं आहे. वीज,गॅस,पेट्रोल डिझेल,अन्नधान्य यांच्या वाढत्या किमतींनी हैराण झालेल्या सामान्य जनतेने,खास करून युवा वर्गाने आवर्जून या मोहिमेत सामील व्हावं असं आवाहनही भिलाणे यांनी केलं आहे.