- लाँकडाऊन मुळे व्यापारी कमी भावाने माल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांत पाणी व उत्तम जमीन असल्याने विविध प्रकारचा भाजीपाला हे येथील स्थानिकांचे उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. यावर्षी भाजीपाला भरघोस उत्पन्न घेऊन आला असला तरी कोरोनाच्या सतर्कतेसाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला खरेदी मंदावली असून व्यापारी अतिशय मनमानी पद्धतीने भाज्यांचे भाव खाली पाडून खरेदी करत असल्याने असल्याने येथील शेतकरी भरडला जात आहे.
विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या मलवाडा गावात पिंजाळ नदीच्या किनाऱ्यावर येथील शेतकरी कमलाकर भोईर यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. ज्यात त्यांनी ईगल व इंदू जातीच्या मिरचीची लावली. भरघोस उत्पन्न आल्याने मिरचीची झाडे अक्षरशः वाकून गेली ज्यात त्यांनी निव्वळ एकदा मिरची तोडून विकली पण त्यानंतर कोरोनाचे कारण सांगत व्यापारी येणे बंद झाले. तर स्थानिक स्थानिक विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील अनेक वडापाव बनविणारी दुकाने आणि हॉटेल्समध्ये देखील मोठ्या प्रमाणत मिरची विकत घेतली जात होती. मात्र वडापाव आणि हॉटेल्स देखील बंद असल्याने स्थानिक व्यापारी देखील बंद झाले आहेत.
किमान तीन ते साडेतीन लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होते मात्र त्यांचा कोरोनाने भ्रमनिराश केला. आज नेहमीचे व्यापारी येणे देखील दुर्मिळच झाले असून खरेदीस येणारे व्यापारी अल्प व लाजीरवाण्या दरात माल मागतात. मोठ्या मेहनतीने लागवड केलेला शेतमाल डोळ्यासमोर सुकत असून भाव मिळत नसल्याने काळीज पिळवटून जात असल्याची प्रतिक्रिया कमलाकर भोईर यांनी दिली. त्यांसोबत रघुनाथ जाधव व मधुकर दोंदे यांच्याही मिरचीची हीच दुर्दशा असून तालुक्यातील भाजीपाला व अन्य शेतमालाची अशीच अवस्था बिकट असून शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधला दुवा असेले व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करून कमी दराने भाज्या खर्डी करून बाजारात चढ्या दराने विकत आहे.
थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना साकारण्याची गरज
कोरोनामुळे लावलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीला मोठा फटका बसला आहे. व्यापारी नसल्याने शेतातच हा माल राहून सडत आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पिकवला जाणारा भाजीपाला हा मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर या महानगर पालिकांमध्ये शेतकऱ्यांना सरळ विक्रीसाठी प्रशासनाने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना देखील याचा फायदा होऊ शकतो.