बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदेचे दबावतंत्र?
◾️शेकडो तक्रारी प्रलंबित ठेवून फक्त निवडणूकीत उतरलेल्या राजकीय मंडळींना पालघर तहसीलदारांच्या नोटीसा; शिंदे गटाकडून बोईसर निवडणूकीत दबावाचे राजकारण
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात शेकडो अनधिकृत बांधकामे सरकारी जागेवर उभी असताना गेल्या दोन वर्षापासून त्याकडे दुर्लक्ष करणारे पालघर तहसीलदार ऐन ग्रामपंचायत निवडणूकीत सक्रिय झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत नामनिर्देशन दाखल केले आहे व ज्यांनी उमेदवार उभे केले आहेत त्यांनाच फक्त नोटीसा काढण्यात आल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी बोईसर मधील एका मोठ्या नेत्याला अशाच प्रकारे नोटीस काढून दबावतंत्र वापरल्यांने त्यांने शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे गट पालघरच्या शिंदेला पुढे करून राजकारण करत आहे का असा सवाल उपस्थित राहत आहे.
पालघर तहसीलदार सुनिल शिंदे यांच्या कार्यकाळात बोईसर महसूल विभागाने गेल्या दोन वर्षापासून शेकडो अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत अहवाल पाठवले होते. मात्र तहसीलदार यांच्या कडून फक्त मोजक्या अनधिकृत बांधकामावर तुटपुंजी कारवाई करण्यात आली होती. बोईसर ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या परीक्षित ठाकूर यांनी आपल्या ताब्यात असलेल्या सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणे बाबत बोईसर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी अहवाल सादर केला होता. मात्र पालघर तहसीलदार यांनी याकडे दुर्लक्ष करून याठिकाणी अनधिकृत बांधकाम होण्यासाठी मुभा दिली होती. भंडारवाडा भागात मताधिक्य असलेल्या परिक्षित यांनी काही भागात आपले उमेदवार उभे करून शिंदे गटाच्या संखेंना आव्हान उभे केले होते. निवडणूक नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्या नंतर 23 सप्टेंबर 2022 रोजी पालघर तहसीलदार यांना अचानक अनधिकृत बांधकाम बाबत जाग आली आणि त्यांनी परीक्षित ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस जाहीर केली. महत्त्वाचे म्हणजे या नोटीस ची सुनावणी नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याच्या अगोदरच्या दिवशी गुरूवारी 29 सप्टेंबर 2022 ठेवण्यात आली होती. मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार मामलेदारांनी टाकलेल्या दबावामुळे परिक्षित ठाकूर आपले उमेदवार निवडणूक मधुन माघार घेणार असल्याचे समोर आले आहे.
भाजपा मधून आताच्या शिंदे गटाच्या पाटीलाच्या सांगण्यावरून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी उपसरपंच यांना देखील आपल्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या अनधिकृत बांधकाम पाडण्याची धमकी देत गुरूवारी चार तास मामलेदारांने आपल्या दालनात बसुन ठेवले होते. त्यानंतर राजकीय हस्तक्षेप झाल्यावर उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामुळे निवडणूकीत शिंदे गट मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. बोईसर भागात शिंदे गटात असलेल्या अनेकांची अनधिकृत बांधकामे असताना त्याकडे मात्र मामलेदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. शासकीय अधिकारी व त्यातल्यात्यात निवडणूक निर्णय अधिकारी अशाप्रकारे निवडणूकीत वागत असल्याने एकप्रकारे लोकशाहीचा गळा आवळला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे भंडारवाडा भागात राहत असलेले दिपक ठाकूर यांचे राहते घर संपूर्ण इमारत सरकारी जागेवर आहे. परंतु ठाकूर हे आता शिंदे गटाच्या पाटील व संखेंच्या जवळचे असल्याने त्यांना मात्र कोणत्याही प्रकारची नोटीस महसूल विभागाने काढली नाही हे विशेष आहे.
◾️पालघरचे तलसीलदार कोणाच्या इशारावर चालतात?
काही दिवसापूर्वी बोईसर मधील मुळ शिवसेनेत उध्दव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असलेल्या एका मोठ्या नेत्याला अनधिकृत बांधकाम बाबत नोटीस बजावली होती. यातच या नेत्यावर अनेक ठिकाणावरून दबाव आणण्यात आला होता. याबाबत दबक्या आवाजात बोईसर मध्ये चर्चा देखील होती. मात्र काही दिवसांपूर्वी हताश झालेल्या नेत्यांने अखेर शिंदे गटात प्रवेश केल्याचे दिसून आले होते.
◾️भंडारवाडा येथील दिपक ठाकूर यांनी बांधकाम केलेल्या इमारतीला बोईसर महसूल विभागाकडून पाठीशी घातले जाते का याबाबत प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “दिपक ठाकूर यांनी सरकारी जागेवर बांधलेल्या इमारती बाबत तलाठी यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत अहवाल तलसीलदार यांच्या कडे सादर केला होता” असे सांगितले आहे. यावरून पालघर तलसीलदायांनी आपल्या पदाचा गैरवापर करून फक्त निवडक लोकांना नोटीसा काढल्याचे दिसून येते.