◾️बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे दबावाचे राजकारण; अनधिकृत इमारतीवर लागले बाळासाहेब व दिघेंचे फोटो
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: अनधिकृत बांधकामाचे माहेरघर असलेल्या बोईसर ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामे बिनविरोध होण्यासाठी मदतीला आले आहे. येथील एका शिंदे गटाच्या माजी ग्रामपंचायत सदस्यांने आपणच उपसरपंच होणार यासाठी महसूल विभागाला हाताशी धरून दबावाचे राजकारण सुरू केले आहे. यातच विरोधात उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धीं महिला उमेदवारांना अनधिकृत बांधकाम बाबत नोटीस काढून उमेदवारी मागे घेण्यासाठी पालघरच्या मामलेदारांला हाताशी धरून दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भाजप व शिवशक्ती संघटनेची आघाडी असलेल्या मागील सरपंच कार्यकाळात उपसरपंच पदापासून दुर राहिलेल्या मंगळमुर्ती नगरचा भाऊ हताश झाला होता. त्यानंतर ग्रामपंचायत मधील घोटाळे बाहेर काढून सत्ताधारी कसे चोर याचा पुरावा सर्वसामान्य लोकांना व ग्रामसभेत ओरडून ओरडून सांगितले जात होते. भाजपाचे माजी कृषी सभापती यांना तर नजरेने बघत नसलेला भाऊ त्यांच्या विरोधात राजकीय कोंडी करण्यासाठी एकही विषय सोडत नव्हता. मात्र एक दिवस याच भाऊला साक्षात्कार झाला आणि अचानक हाच भाऊ सत्ताधारी यांच्या सोबत घरोबा करताना दिसून आला आणि बोईसरचे वाटोळे झाले. त्यावेळी सत्तेवर असलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात प्रत्येक मासिक सभेत रणशिंग उभे करून चुकांवर बोटे ठेवली जात होती. मात्र हीच बोटे कालांतराने मधा सारखी गोड वाटू लागली होती. अचानक बोईसर ग्रामपंचायत मध्ये विरोधकाची भुमिका घेणारे विरोधक गायब झाल्याने सत्ताधारी मोकाट झाले होते.
शिवसेना मधील आमदारांनी बंड केल्यानंतर ठाण्याच्या जिवावर उड्या मारणारे बोईसर मधील दादा भाऊ काही काळ शांत होते. यातच दादा शिंदे गटात गेल्यावर भाऊ तरी देखील ठाकरे यांच्या मुळ शिवसेना सोबत ठाण उभा होता. बोईसर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाऊने थेट शिंदेच्या मांडीवर उडी मारत जिल्ह्याचे पद पदरात पाडून घेतले. जिल्ह्याचे पद मिळाले तरी कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीचा मोह काही आवरता आला नाही. आता याच भाऊंना उपसरपंच होण्याचे डोहाळे लागले असुन अशा दडपशाही पध्दतीने निवडणूकीत सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्यांना मतदार नेमकी कोणती जागा दाखवतात हे निवडणूक निकाल जाहीर होईल पर्यंत पाहावे लागणार आहे.
◾️अनधिकृत इमारतीवर बाळासाहेब व दिघेंचे फोटो
बोईसर काटकर पाडा येथील रस्त्यालगत असलेल्या छोट्याश्या अडचणीच्या जागेवर साधारण एक वर्षापूर्वी अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी याच इमारतीच्या एका मोठ्या काचेवर बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटो सह बोईसरचे माजी उपसरपंच व आताच शिंदे गटात सहभागी झालेल्या निलम संखे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. अनधिकृत इमारतीवर हे छायाचित्र नेमके कोणाच्या सांगण्यावरून लावण्यात आले हा चर्चेचा विषय बनला आहे. विशेष या इमारतीवर प्रशासनाने आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
◾️दहीहंडीच्या वेळी एकमेकांची डोकी फोडून बोईसरचे वातावरण दुषित करणारी मंडळी आता एकमेकांना स्वागताचे अभिनंदनाचे पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. मतदारांना गृहीत धरून आपण सांगणार तोच उमेदवार निवडून येणार अशा तोऱ्यात असलेल्या राजकीय मंडळींना सर्वसामान्य मतदारांनी निकालातून दाखवून देणे काळाची गरज आहे.