◾️बोईसरच्या थेट सरपंच पदासाठी वेळेनंतर घेतला उमेदवारी अर्ज माघार; निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कारनामा?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: ग्रामपंचायत निवडणूक मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेवुन मोठ्या प्रमाणात दडपशाही सत्ताधारी पक्षांनी वापरली असल्याचे स्पष्ट झाले होते. यातच आता पुन्हा एक नवीन वादग्रस्त विषय समोर आला असुन थेट सरपंच पदाचा उमेदवारी नामनिर्देशन अर्ज माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सोबत तडजोड करून वेळे नंतर अर्ज माघार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पालघर तलसीलदार यांनी एकप्रकारे सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना निवडून आणण्याचा विडा उचलला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तहसीलदार यांचे दबावतंत्र बाबत अनेक विषय उघड झाले होते. यातच आता नवीन कारनामा निवडणूक विभागाचा समोर आला आहे. बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मनोज माधव मोर यांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला नव्हता. मात्र त्यानंतर बोईसर मधील भाजप नेत्यांचा दबाव वाढल्याने त्यांनी 3 वाजून 10 मिनिटांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी यांच्या सोबत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलावर गेले होते. यावेळी वेळ निघून गेली असे सुरूवातीला तेथील अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र राजकीय दबावामुळे व पालघरचे तलसीलदार यांनीच भाजप शिंदे गटाचे उमेदवार निवडून देण्याचा विडा घेतल्यांने बेकायदेशीर पणे मनोज मोर यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आला.
थेट सरपंच पदासाठी सुरूवातीला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे मनोज मोर यांच्या बहिणीला भाजप कडून सदस्य पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज यांनी माघार घ्यावी याबाबत भाजप व शिंदे गटाकडून जोरदार दबावाची स्थिती निर्माण करण्यात आली होती. मात्र तरीही मनोज यांनी माघार घेतली नव्हती मात्र राजकीय दबावाखाली येवून मनोज यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. परंतु उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा वेळ निघून गेल्यानंतर भाजप व शिंदे गटाने शिंदे कार्ड वापरत नियमबाह्य पध्दतीने उमेदवारी अर्ज माघार घेतला. विशेष म्हणजे याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र दवणे यांनी देखील दबावाखाली येत आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केला आहे. याबाबत पालघरचे तहसीलदार व निवडणूक अधिकारी सुनील शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत दुर्लक्ष करत एकप्रकारे या दडपशाही कामाला पाठीशी घातले आहे.
◾️उमेदवारी अर्ज माघार घेणाऱ्यांची मोठी रांग असल्याने उशीर झाल्याचा कांगावा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून घेतला जात आहे. मात्र रांगेत उभे असलेल्या उमेदवारांना टोकन किंवा त्यांची नोंद घेण्यात होती का? याच भागात असलेल्या पालघर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही चे चित्रीकरण तपासणी केल्यास याबाबत सविस्तर चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल.
◾️उमेदवारी अर्ज माघार घेणारे मनोज मोर यांना याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी व तुम्ही कोणाच्या दबावाखाली वेळे नंतर उमेदवारी अर्ज माघार घेतला हे विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले आहे. यामुळे या प्रकरणातील संशय अधिक बळावला आहे.
◾️उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बोईसर मधील उमेदवारांची मोठी गर्दी याठिकाणी होती. उमेदवारांची रांग मोठी असल्याने उशीर झाला होता.
— देवेंद्र दवणे, निवडणूक निर्णय अधिकारी बोईसर