◾️ग्रामपंचायत कर्मचारी निघाला भुमाफिया; सरकारी जागेवर अनधिकृत इमारत बांधणाऱ्यांना संरक्षण
पालघर दर्पण: हेमेंद पाटील
बोईसर: शहरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना प्रशासन पाठीशी घालत असून येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साधारण कामकाज करणारा कर्मचारी थेट सरकारी जागेवर इमारतीचे बांधकाम करत असता देखील प्रशासन इमारत पुर्ण होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. यातच बोईसर महसूल विभागाने कारवाई बाबत अहवाल सादर करून देखील तलसीलदार यांनी फक्त निवडणूक कार्यकाळात नोटीस काढण्याचा दिखावा केला होता.
बोईसर भंडारवाडा भागात मुख्य रस्त्यालगत दिपक ठाकूर यांची बेकायदेशीर इमारत उभी असताना देखील त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. निवडणूक कार्यकाळात इतरांना नोटीसा काढणारे पालघर तहसीलदार यांनी मात्र ठाकूर यांच्या इमारतीवर मेहरबानी दाखवून दिली. विशेष म्हणजे याच अनधिकृत इमारती मध्ये राहत असलेला बोईसर ग्रामपंचायत कर्मचारी परिक्षत ठाकूर यांनी बोईसर दांडीपाडा भागात सरकारी जागेवर अनधिकृत इमारतीचक बांधकाम केले आहे. वर्षभरापूर्वी याबाबत स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कारवाई बाबत पालघर तहसीलदार यांच्या कडे अहवाल सादर केला होता. मात्र संधी शोधून कारवाई करणारे तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई याठिकाणी केली नव्हती. मात्र ग्रामपंचायत निवडणूकीत या इमारतीला नोटीस काढून राजकीय तडजोड ठाकूर यांची शिंदे गटासोबत झाल्याची चर्चा बोईसर मध्ये जोरदार सुरू आहे.
बोईसर ग्रामपंचायत कर्मचारी असताना शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यावर अनधिकृत बांधकाम सुरू करताना प्रशासनाने यावर कठोर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र सुवर्णमध्य काढण्यात अग्रेसर असलेला पालघरचा महसूल विभागाने सरकारी जागेवर इमारत उभी राहण्यासाठी मोकळीक दिली होती. महत्त्वाचे म्हणजे अशा अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायत मार्फत ठाकूर हा कर्मचारी सुविधा देखील पुरवत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. एकीकडे घराची दुरूस्ती सुरू असताना कारवाई चा दम भरणारे महसूल अधिकारी अशा अनधिकृत इमारती कडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे आता पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे परिक्षित ठाकूर यांनी सरकारी जागेवर उभी केलेली अनधिकृत इमारत पाडतात की संरक्षण देतात याकडे पाहणे औचित्यांचे ठरणार आहे.