◾ बनावट कागदपत्रांच्या आधारे केली सरकारी जागेची विक्री; दिलीप धोंडी यांचा बनावट कारनामा उघड
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरातील भुमाफिया हा बोईसरच्या थेट सरपंच पदाचा भाजप व शिंदे गटाचा उमेदवार असल्याचे उघडकीस आले आहे. याच महाशयांनी सरकारी जागेची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे भ्रष्टाचार मुक्त सरकार बनवण्याचा दावा करणारे भाजप शिंदे गटाचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे बोईसर मध्ये सुरू असलेली उलटसुलट चर्चा भाजप शिंदे गटाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप व शिंदे गटाचा युतीचा उमेदवार म्हणून येथील सरकारी जागा बळकविणारा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दिलीप धोंडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पैशाच्या जोरावर उमेदवार दिला असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता. मात्र या महाशयांचे एक महत्त्वाचे प्रकरण बाहेर पडले असुन यामध्ये सरकारी जागेची बनावट कागदपत्रे तयार करून थेट सरकारी जागा विक्री करण्यात आली आहे. एकाच व्यक्तींच्या नावे वेगवेगळे कागदपत्रे बनवून हा संपूर्ण पराक्रम करण्यात आला आहे. भाजप व शिंदे गटाने उमेदवार दिलीप धोंडी हा जाहिर केल्यानंतर याबाबत धोंडी यांनी केलेली सरकारी जागेची विक्री याबाबत पुरावे गोळा करण्याची सुरुवात केली होती. याबाबत धक्कादायक पुरावे पालघर दर्पण च्या हाती लागले असुन निवडणूक मतदान अगोदरच भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांचा मुखवटा उतरला आहे. खोट्या कागदपत्रांवर सरकारी शिक्के मारून विक्री केलेली सरकारी जागाचे प्रकरणं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करणारे आहे.
आदिवासी जागेची खरेदी विक्री गरीबांना मारहाण अशा अनेक बेकायदेशीरपणे धंद्यात सहभागी असलेल्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील स्थानिक नेते देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने भूमाफियांच्या पैशा कडे पाहुन नेते बोईसर चे वाटोळे करत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. बोईसर पुर्व भागात या भुमाफियांची दहशत असुन सरकारी एकच जागा अनेक लोकांना ते देखील विक्री केली जाते. दिलीप धोंडी यांनी काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सरकारी जागेची मोठी विल्हेवाट लावली आहे. यामुळे अशा उमेदवारांना भाजप पाठीशी घालून आपली भ्रष्टाचार मुक्त सरकारची भूमिका कितपत यशस्वी करतात याकडे पाहणे औचित्यांचे ठरणार आहे.