◾ बोगस कागदपत्रांच्या आधारे बोईसर भागात शेकडो जागेची विक्री; धनानी नगर, गणेश नगर भागात सरकारी जागेची परप्रांतीयांना विक्री
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच साठी व सदस्य साठी उभ्या असलेल्या काही उमेदवारांची अनधिकृत घरे शासकीय जागेवर असल्याने अनधिकृत बांधकामे करणारेच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्षांचा विषय नसला तरी बोईसर मध्ये अनधिकृत बांधकामे करणारे व त्यांचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या छत्रछायेखाली निवडणुकीत उतरलेले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे योग्य उमेदवार नसल्याने नेमके मतदान कोणाला करायचे याचा पेच निर्माण झाला आहे.
बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी उमेदवार उभा असलेल्यांवर शासकीय भूखंडावरील बनावट गावठाण दाखले बनवून जागा विक्री केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पालघर दर्पण देखील सर्वप्रथम विषय उघडकीस आणुन भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांचा विषय उघडकीस आणला होता. यातच शासकीय अधिकाऱ्यांनी केलेला जमीन घोटाळ्याची चौकशी देखील आजवर करण्यात आलेली नाही. बोईसर भागात हा एक विषय समोर आला असला तरी गणेश नगर, यादव नगर, काटकर पाडा, धनानी नगर अशा अनेक भागात शासकीय व आदिवासी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सरपंच पदासाठी उमेदवार उभ्या असलेल्या उमेदवारांनी तर दुसरीकडे त्यांच्या पती कडून करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून बोईसर मधील राजकीय मंडळींना एकही स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार मिळाला नाही हे विशेष आहे. गणेश नगर भागात सरकारी जागा विक्री करणारेच निवडणूकीत उभे असल्याने भूमाफियांच्या हाती बोईसर ची सत्ता जाणार का असा सवाल उपस्थित राहत आहे.
बोईसर महसूल विभाग व बोईसर ग्रामपंचायत येथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सन २०१५ साली मोठ्या प्रमाणात शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी चक्क वनविभागाच्या जागेची व महसूल विभागाच्या जागेचे गावठाण जागेचे बनावट दाखले मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहेत. बोईसर मध्ये बनावट गावठाण दाखले दिले गेले असल्याने दुय्यम निबंधक पालघर बोईसर कार्यालयात ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांनी साधारण चार ते पाच वेळा लेखी पत्र देवून दाखल्यांची शहानिशा करून नंतरच नोंद करावी असे पत्र दिल्या नंतर देखील दुय्यम निबंधक यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्वाचे म्हणजे पालघर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी पालघर यांना बोईसर ग्रामपंचायत कडून याबाबत लेखी कळवून पाठपुरावा केला असताना देखील कोणत्याही शासकीय विभागांचे यांची साधी चौकशी देखील केली नाही. निवडणुकीत याबाबत पालघर दर्पण कडे पुरावे मिळाल्यानंतर पालघर दर्पणने हा विषय प्रकाश झोतात आणला आहे.
◾ बोईसर ग्रामपंचायत मार्फत ज्यावेळी बनावट दाखले बाबत माहिती ग्रामविकास अधिकारी यांना समजली त्यावेळी वर्षभरापूर्वी त्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला होता. असे असले तरी याठिकाणी असलेल्या अनधिकृत घरांना मात्र देण्यात येणाऱ्या घरपट्टी वरती कोणत्याही प्रकारचा अनधिकृत असा शिक्का मारण्यात आलेला नाही. येथील एक अनधिकृत बांधकाम करणारा ठाकूर नावाचा कर्मचारी बनावट कामे छुप्या पद्धतीने करण्यात पुढे असला तरी राजकीय दबावामुळे ग्रामविकास अधिकारी यांना देखील कारवाई करण्यासाठी अडचणी तर येत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
◾ बोईसर तलाठी यांना हाताशी धरून माफियांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला असुन याबाबत पुरावे पालघर दर्पण च्या हाती लागले आहेत. रूपरजत नगरच्या बाजूला असलेली गावदेवी जागेवर येथील राजकीय मंडळींनी अतिक्रमण करून घराचे देखील बांधकाम केल्याचं दिसून आले आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावदेवी म्हणून गावाच्या देवस्थान ची असलेली जागा थेट एकाच्या नावाने केली आहे. बनावट फेरफार करून केलेली नोंद यामुळे जागेचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.