◾ माजी कृषी सभापती अशोक वडे यांना आवाहन देण्याचा प्रयत्न
◾ बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचा स्थानिक विरूद्ध परप्रांतीय गट?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वेगळेच राजकारण बोईसर मध्ये पाहावयास मिळत आहे. याठिकाणी एक उमेदवार पक्षाकडून मान्य केल्यानंतर दुसऱ्या गटाने आपला उभा केलेला उमेदवार हा भाजपाचा आहे असा प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो असुन काही फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा देखील वापर केला आहे. विशेष म्हणजे माजी कृषी सभापती यांनी मोठी केलेली हिंदुत्ववादी संघटनेची पिलावळ ही थेट स्थानिकांना आवाहन देत असल्याने स्थानिक विरूद्ध परप्रांतीय असे चित्र निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देताना सुरूवातीला बजरंग दलाचा पाठींबा असलेला उमेदवार हितेन दुमाडा किंवा त्यांची पत्नी सोनाली हितेन दुमाला यांचे नाव चर्चेत होते. परंतु उमेदवार निवड होण्यापूर्वीच स्वघोषित हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोईसर मध्ये आम्ही सांगतील तोच उमेदवार निवडून येईल असा अपप्रचार सुरू केल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजपा व शिवसेना शिंदे गटाने दिलीप धोंडी यांची उमेदवारी भाजपा कडून थेट सरपंच पदासाठी घोषीत केली. यावेळी बोईसर मधील हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपच्या उमेदवारीला विरोध करत काही भाजप मधील प्रवाहाच्या बाजूला असलेल्या नेत्यांना एकत्र करून स्थानिक विरूद्ध परप्रांतीय असा चेहरा निर्माण केला. विशेष म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ स्तरावरून अधिकृत म्हणून दिलीप धोंडी यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर देखील भाजपच्या काही मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर नेत्यांचे फोटो सोनाली दुमाडा यांच्या बॅनर वरती टाकून एक वेगळाच घरोबा सुरू केला आहे. यामुळे एकाच पक्षांचे दोन उमेदवार प्रचारात दिसत असल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आलेले बोईसर मध्ये दिसायला लागले आहेत.
बोईसर शहरातील अनुभवी राजकारणी असलेले भाजपाचे कृषी सभापती अशोक वडे यांनी गेल्या पाच वर्षात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जवळ करत त्यांना बोईसर मध्ये राजकीय पाठबळ दिले होते. पोलिस ठाण्यात असलेले विषय असो किंवा इतर राजकीय वाद यामध्ये या हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा फायदा झाला होता. मात्र बोईसरच्या थेट सरपंच पदासाठी उमेदवारी निश्चित केल्यानंतर ही सर्व मंडळी अशोक वडे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जात वेगळा गट निर्माण करण्याची सुरुवात केली. यामुळे स्थानिकांन पेक्षा बाहेरचा जवळचा या स्थितीमुळे आता मोठा पेच बोईसर मधील नेत्यांच्या समोर उभा राहिला आहे. भाजपाचे स्थानिक असलेले सर्व नेते निवडणूक फलकांवर एकत्र असल्याचे दिसून येत असले तरी मतदानाच्या दिवसांपर्यंत नेमके काय स्थिती निर्माण होते याकडे लक्ष देणेचे महत्वाचे ठरणार आहे. मात्र सध्यातरी बोईसर मध्ये भाजपाचे स्थानिक विरूद्ध परप्रांतीय असेच चित्र बोईसर वासीयांना पाहावयास मिळत आहे.
◾ अनधिकृत बांधकाम करणारे हिंदुत्ववादी संघटने मध्ये कार्यरत असुन मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक करणारे आता बोईसरच्या राजकारणात आपले भविष्य आजमावून पाहत आहेत. विशेष म्हणजे रूपरजत मध्ये अनधिकृत बांधकाम करून स्थानिकांचा आजवर पाठींबा घेणारा महाविर आज मात्र स्थानिकांच्या विरोधात उभा राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.