◾️बोईसर गणेश नगर भागातील भुमाफियांना परप्रांतीय गरिब कामगार वर्गाला लुटले?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गेल्या काही दशकापासून बोईसरच्या सरकारी व आदिवासी जागा बळकावून त्यावर अनधिकृत बांधकामे करणारी टोळी सक्रिय झालेली आहे. एकच जागा किंवा चाळीतील घर तिन लोकांना विकणारे आता बोईसरच्या निवडणुकीत उतरले आहेत. येथील औद्योगिक क्षेत्रात काबाडकष्ट करून राहण्यासाठी निवारा शोधणारे परप्रांतीयांना फसविणारे आता त्यांचे कैवारी झाल्यासारखे दाखवत असून लुटारूच आता जनसेवा करत असल्याचा मुखवटा घालून बोईसर मध्ये निवडणूक प्रचारात फिरताना दिसत आहेत.
आदिवासी जागा कवडीमोल भावाने विकत घेवून त्यावर बेकायदेशीर चाळीचे मोठे बांधकाम बोईसरच्या गणेश नगर भागात उभे राहिले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी सरकारी व वनविभागाच्या आरक्षित जागेवर सुध्दा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. अशा अनधिकृत बांधकामाचे निर्माण करणारे माफियांचे आता बोईसरच्या तिजोरीवर लक्ष केंद्रित झाले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. बोईसरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून काही उभे असलेले व त्यांचे संबंधित असलेल्यांनी बोईसर गणेश भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळीचे बांधकाम केले आहे. यातच एकच चाळीची रूम दोन ते तिन लोकांना विक्री देखील केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. गणेश नगर भागात तर आदिवासी जागा देखील दलालांनी एकच जागा अनेकांना विक्री करून लाखो रूपयाची माया गोळा केली आहे. एखाद्यांने तक्रार जरी केली तरी त्याचा आवाज दाबण्याचे काम येथील गुंडगिरी करणाऱ्यांन कडून केले जाते.
बोईसर गणेश नगर भागात काही ठिकाणी आजही अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहेत. स्थानिक तलाठी व त्यांचे कोतवाल हे या अनधिकृत बांधकामे उभे करण्यासाठी हातभार लावतात. एखाद्या माफियांने महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तलाठी त्याच अनधिकृत बांधकामाचा अहवाल पालघर तहसीलदार यांना सादर करतात. प्रत्येक्षात मात्र हजारो बांधकामे उभी राहिलेली असताना देखील एखादी कारवाई सोडली तर इतर बांधकामांवर प्रशासनाची देखील मेहरबानी आहे. यामुळे येथील भुमाफियांना देखील बळ मिळत असुन आता हेच माफिया बोईसरच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे जोडीदार हे येथील काही वर्षांपूर्वी विकलेल्या आदिवासी जागेवर उभारलेल्या घरांचे आजही हक्क दाखवत लाखोची वसुली करत असल्याचे दिसून आले आहे.
गणेश नगर भागात आदिवासी जागा परप्रांतीयांना येथील लोकांनी विकल्या आहेत. यातील काही ठिकाणी चाळीचे बांधकाम करण्यात आले असुन एखादे चाळीतील रूम जर परप्रांतीय कामगाराने विकली तर ती विकत घेणाऱ्यां कडून 40 ते 50 हजाराची वसुली एका थेट सरपंच पदाचे उमेदवार असल्यांचे जोडीदार करतात. विशेष याच भागात एखाद्या परप्रांतीयांने घराचे बांधकाम किंवा इतर कामासाठी बांधकाम साहित्य मागवले तर ते त्याच माफियांन कडून त्यांना विकत घ्यावे लागते. बाहेरून कोणत्याही प्रकारचा ट्रक याठिकाणी आला तर त्या ट्रक च्या मागे थेट दोन तिन लोकांना पाठवले जाते. अशा प्रकारे गेल्या 10 वर्षात औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाला वेठीस धरणारे व त्यांना लुटणारे आता अचानक परप्रांतीय प्रेम दाखवत हिंदुत्ववाचा मुखवटा घालून बोईसरच्या निवडणूकीत उतरल्याने येणाऱ्या काळात नेमके काय चित्र स्पष्ट होते हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.