◾ निवडणूक प्रचारात सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसताना लावले रस्त्यावर फलक; बोईसर ग्रामपंचायतीने देखील कोणत्याही प्रकारची शहानिशा न करताच दिल्या परवानग्या
◾ बोईसर मधील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या प्रचाराकडे निवडणूक विभागाचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: ग्रामपंचायत निवडणूकीत बेभान झालेल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाचे नियम धुडकावून आपला प्रचार सुरू केला आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर जाहिरात फलक मोठ्या प्रमाणात बोईसरच्या रस्त्यालगत लावलेले दिसून येतात. यातच बोईसर ग्रामपंचायत कडून काही घेतलेल्या परवानग्या ची कागदपत्रे तपासणी न करताच शासकीय जागेवर ग्रामपंचायतीने फलक लावण्यासाठी परवानगी दिली आहे का असा सवाल उपस्थित राहत आहे. गेल्या चार दिवसांपासून याठिकाणी शेकडो बेकायदेशीर फलक प्रत्येक रस्त्यालगत लावलेले असतात देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बोईसर ग्रामपंचायत मध्ये आपले खाते उघडावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी संघटनांनी बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या चार दिवसांपासून बोईसर मध्ये प्रचार प्रत्येक्षात सुरू झाला असुन लाखो रुपये खर्च करून मोठमोठे फलक मुख्य राज्य मार्ग असलेल्या बोईसर तारापूर रस्त्यालगत लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक फलक हे सार्वजनिक जागेवर लावता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या रस्त्याच्या कडेला फलक लावायचा असल्यास त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र बोईसर मधील उमेदवारांनी निवडणूक आयोगाचे सर्व नियम धुडकावून रस्त्याच्या दुतर्फा मोठं मोठे फलक लावलेले दिसून येतात. असे असले तरी निवडणूक विभागाने किंवा संबंधित ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
बोईसर ग्रामपंचायत मधुन काही प्रमाणात उमेदवारांनी फलक लावण्याची परवानगी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसताना ग्रामपंचायतीने परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्वाचे म्हणजे ज्याठिकाणी फलक लावण्यात येणार आहे. त्याठिकाणी संबंध जागा मालक व घर मालकांची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून ग्रामपंचायत कडून जाहिरात फलकाचे शुल्क आकारणी करून परवानगी दिली जाते. परंतु बोईसर मध्ये सर्व नियमांची पायमल्ली करून बेकायदेशीरपणे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले असताना देखील ग्रामपंचायत व निवडणूक विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. निवडणूक प्रचारात फलक लावताना त्या फलकांवर घेतलेली परवानगी ची पावती छापने बंधनकारक असते मात्र संपूर्ण बोईसर मध्ये एकाही फलकांवर पावती छापलेली दिसून येत नाही. यामुळे आता निवडणूक विभागाचे नियम धुडकावून लावण्यात आलेल्या फलकांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
◾ गेल्या चार दिवसांपासून बोईसर शहरात निवडणूक प्रचारात प्रत्येक उमेदवाराने लाखो रूपयांचा खर्च केला आहे. मोठमोठे फलक व प्रचार पत्रके यासाठी मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाल्याचे दिसून येते. मुख्य रस्त्यालगत लावलेल्या १० फुट बाय २० फुट फलकांचा साधारण बाजार भाव खर्च हा ३ हजार ५०० रूपये कमीत कमी आहे. जर फलकाला लाकडी चौकट असेल तर हाच खर्च ५ हजार पर्यंत जातो. याठिकाणी थेट सरपंच पदासाठी उमेदवार असलेल्यांनी ८० ते ९० हजारांचे फलक लावलेले दिसून येतात. तर सदस्य पदासाठी असलेल्या उमेदवारांनी २० ते २५ हजार पेक्षा अधिक किमतीचे फलक लावलेले आहेत. यामुळे निवडणूक आयोगाने बोईसर मधील उमेदवारांचा दैनंदिन खर्च चोख तपासणी करणे गरजेचे आहे.