◾भिमनगर व वंजारवाडा भागातील मतदान देखील भाजप शिंदे गटाला महत्वाचे
◾ भाजप शिवसेना युतीचा उमेदवाराचे काही भागात पारडे जड
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: थेट सरपंच जनतेतून निवडून आणण्यासाठी बोईसर मध्ये तिनही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपला जोरदार प्रचार गेल्या आठवडाभर केला होता. यावेळी काही उमेदवारांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावरील प्रचार थंडावल्या नंतर गल्ली बोळात रात्रीचा प्रवास जोमाने सुरू झाला आहे. सर्व उमेदवारांनी आपापली मतांची गणिते मांडली असली तरी बोईसर मधील काटकर पाडा हा बोईसरचा थेट सरपंच ठरवणार आहे. याभागात असलेली सेनेची मजबूत बांधणी एक गठ्ठा मते मिळवून देण्याची शक्यता आहे. यातच तिनही उमेदवारांचे वेगवेगळ्या भागात मतांचे गणित असले तरी सध्यातरी भाजप शिवसेना शिंदे गटाचे पारडे जड दिसून येते.
शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बोईसर काटकर पाडा या गावात ५७५९ मतदार आहेत. याभागातुन गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेचे उमेदवार सर्व प्रभागातून निवडणूक येतात. याभागात केलेली विकासकामे यामुळे याठिकाणी शिवसेनेचे आताच्या शिंदे गटाचे मोठे प्राबल्य आहे. काटकर पाडा भागातुन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलम संखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे आता याभागातुन युतीचे दोन यापुर्वी सदस्य असलेले परशुराम दुमाडा व कामिनी सुतार या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी निलम संखे यांच्या वर आहे. महत्वाचे म्हणजे या काटकर पाडा भागात थेट सरपंच पदासाठी मतांची कोणत्याही प्रकारची विभाजन मोठ्या प्रमाणात झाली नाही तर युतीचा उमेदवार दिलीप धोंडी यांचा विजय निश्चित होऊ शकतो. काटकर पाडा मतदार संघात भवानी चौक परिसर, मंगळमुर्ती नगर, केशव नगर असा सर्व मोठा रहिवासी संकुल असलेला भाग आहे. येथील मतदारांचा कौल हा आजवर शिवसेना सोबत असल्याने हा गड अबाधित ठेवण्यासाठी शिंदे गटाचे निलम संखे व शहर प्रमुख मुकेश पाटील यांची जबाबदारी वाढलेली आहे. बोईसर चे राजकारण काटकर पाडा भागातुन ठरविले जाणार असल्याने येथील याभागात नेमके काय गणित ठरते हे मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
बोईसर ग्रामपंचायतीवर शिवशक्ती संघटनेचे गेल्या १५ वर्षांपासून वर्चस्व होते. यावेळी भाजप शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यानंतर थेट सरपंच पदाच्या उमेदवारी वरून मतभेद झाल्याने शिवशक्ती संघटनेने फक्त सिडको मध्ये आपले उमेदवार उभे करत थेट सरपंच पदाच्या शर्यतीतून थोड दुरच राहणे पसंत केले आहे. विशेष म्हणजे भिमनगर येथील उभे असलेले उमेदवार हे शिवशक्ती संघटनेचे असताना त्यांना भाजपाचे उमेदवार म्हणून घोषित करून फक्त भिमनगर पुरती शिवशक्ती संघटनेने भाजप व शिवसेना शिंदे गटा सोबत युती केली आहे. हे सर्व राजकीय डावपेच सर्व सामान्य मतदारांच्या विचारा पलिकडचे असले तरी याभागातुन थेट सरपंच पदासाठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील यांनी भाजप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला विरोध केल्याने त्यांनी इतर पर्याय पाहिले आहेत. परंतु याच भागातील संजय पाटील यांचे खंदे समर्थक भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे यांची पत्नी माधवी भोणे या विद्यमान सदस्य होत्या त्यांचे भिमनगर भागात असलेले प्राबल्य लक्षात घेवून त्यांना उमेदवारी भाजपाने दिली. भिमनगर भागात ४१२९ मतदार असुन आता थेट सरपंच पदासाठी याभागातुन मतांची विभाजणी न होता मतदान युतीच्या पारड्यात पडले तर मोठ्या मताधिक्यांने भाजप शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडून येवुन शकतो.
◾बोईसर वंजारवाडा भागात ६०७४ मतदार असुन याठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गटाला फटका बसु नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याभागात असलेली मोठी लोकवस्ती व परप्रांतीय मतदारांची संख्या लक्षात घेता याठिकाणी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. यातच भाजपाचे माजी कृषी सभापती अशोक वडे यांचे हे गाव असल्याने बोईसर भाजपात झालेले दोन गट यामुळे येथील मतांच्या आकडेवारीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
◾ भाजपाचे दोन गट निर्माण झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी भाजपचे काही बाजूला पडलेल्या नाराज मंडळींना सोबत घेवुन सोनाली दुमाडा यांना थेट सरपंच पदाच्या शर्यतीत उभे केले. परप्रांतीय लोकांना एकत्रित करत त्यांनी निवडणूक प्रचारात स्थानिक विरूद्ध परप्रांतीय असा नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला होता. सुरूवातीला झालेला जोरदार प्रचार भाजप व शिंदे गटाचा युतीचा उमेदवाराला घाम फोडणारा होता. मात्र जसजसा प्रचार थंडावला त्यानुसार काही परप्रांतीय वस्ती असलेल्यांनी देखील कोणत्याही वादात पडण्या कडे दुर्लक्ष करत त्यांच्या कडे पाठ केल्याचे दिसून आले आहे. कट्टर हिंदुत्ववादी संघटनांने पाठींबा दिलेला उमेदवार काही भागात मतांची जुळवाजुळव करत असल्याने बोईसर चा निकाल महत्वाचा ठरणार आहे.