◾️ भाजपाची बंडखोरी, शिवसेना शिंदे गट व शिवशक्ती साठी डोकेदुखी
◾१५ वर्षे सत्तेत असलेल्या अजय ठाकुरांची पुन्हा आघाडी?
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शहरातील सिडको मतदार संघात मोठी लढत पाहायला मिळत असुन याठिकाणी असलेले चारही उमेदवार आपापल्या परीने निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र याठिकाणी बंडखोरी करत भाजपाच्या उमेदवाराने अर्ज दाखल करत सोपी असलेली निवडणूक अधिक रंजक केली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी शिवसेना शिंदे गट व भाजपाचा अधिकृत उमेदवार उभा असताना देखील भाजपच्या दुसऱ्या गटातील उमेदवारांने देखील आपल्या वैयक्तिक ताकदीवर निवडणूक प्रचारात सहभाग घेतला होता.
बोईसर ग्रामपंचायत भागातील सिडको भागात यावेळी वाढीव असे भीमनगर मतदार संघातील साधारण ७०० मतदार वर्ग झाले असुन याभागात ३७७६ इतके मतदार आहेत. सिडकोची एक जागा शिवशक्ती संघटना साठी द्यावी असा आग्रह भाजप कडे केला होता. परंतु याठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य असल्याने ही जागा शिवसेनेच्या वाटेला गेली. यामुळे शिवशक्ती संघटनेने आपला उमेदवार याठिकाणी उभा केला आहे. सुरूवातीला याभागात शिवशक्ती व शिवसेना शिंदे गटात लढत होईल असे चित्र होते. मात्र भाजपाच्या एका गटाने अंकुर राऊळ यांना पाठींबा देत उमेदवारी अर्ज माघार घेतला नाही. यामुळे येथील लढत चुरशीची झाली होती. निवडणूक प्रचारात याठिकाणी असलेला भाजप अंकुर गटाचा फलक देखील विरोधकांनी फाडला असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे याभागात ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून निवृत्त झालेले संतोष मराठे यांनी देखील निवडणूक रिंगणात उडी मारल्याने मराठा समाजाची असलेली मते त्यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.
शिवशक्ती संघटनेने आपला प्रचार जोरदार सुरू केला होता. संघटनेचे संजय पाटील देखील थेट घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेताना दिसले. याभागात भाजपाच्या अंकुर गटाने आपल्या सहकाऱ्यांना घेवून प्रचार सुरू केला होता. रहिवासी संकुल असलेल्या भागात काही प्रमाणात अंकुर यांना मतांचे गणित जुळविणे शक्य झाल्याने भाजपाच्या बंडखोर उमेदवार शिवसेना शिंदे गट व शिवशक्ती साठी डोकेदुखी ठरला आहे. सिडको भागात घराघरात व गल्ली बोळात शिवसेना शिंदे गट व भाजप युतीचे उमेदवार अजय ठाकुरांचा परिचय आहे. प्रत्येक मतदारांचा गेल्या १५ वर्षांचा असलेला अनुभव व जनसंपर्क यामुळे सध्या तरी शिवसेना शिंदे गटाचा युतीचा उमेदवार हा आघाडीवर दिसुन येत आहे. मात्र या मतदारसंघात वाढलेले मतदार हे नेमके कोणाच्या पारड्यात मतदान करतात यावरून विजयाचे गणित ठरणार असुन राजकीय फटका कोणाला बसणार हे मतदाना नंतर ठरणार आहे.