◾ बोईसर नवापूर नाक्यावरील शिवसेना शाखेतील मुकबधीर मुलांला मारहाण; बाळासाहेबांची शिवसेना यांच्या ताब्यात होते शिवसेनेचे शाखा कार्यालय
◾ गुन्हा दाखल झाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी केले आरोपींना फरार?
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: शहरातील नवापूर रोड येथे असलेले शिवसेनेचे शाखा कार्यालय हे बाळासाहेबांची शिवसेनेच्या ताब्यात असुन या कार्यालयात दरोडा टाकून मुकबधीर मुलांला मारहाण करण्यात आली आहे. बोईसर येथील सराईत गुन्हेगारांनी हे काम केले असुन गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आला त्यादरम्यान काही आरोपी बोईसर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या सोबत होते. मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर अचानक आरोपी पोलिस ठाण्यातुन गायब झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांचे उपजिल्हा प्रमुख निलम संखे यांच्या ताब्यात बोईसर नवापूर नाका येथे शिवसेनेची शाखा कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळी ४:५० वाजता संदीप शहा हा मुकबधीर मुलगा शाखा कार्यालय बंद करून जात असताना साधारण १० लोकांनी एकत्र येऊन बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे कुलूप तोडले. यावेळी त्याठिकाणी आलेला शाखेतील कर्मचारी यांने विरोध केला असता त्याला मारहाण करण्यात आली होती. शाखेतील गोपनीय दस्तऐवज व साधारण २५ हजार रुपये सराईत गुन्हेगार घेवून प्रसार झाले होते. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षांचे पदाधिकारी निलम संखे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी बोईसर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाळासाहेबांची शिवसेना शाखेचा ताबा उपजिल्हा प्रमुख निलम संखे यांच्या कडे असल्याने त्यांच्या फिर्यादी वरून याबाबत गुन्हा बोईसर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
बाळासाहेबांची शिवसेनेची असलेल्या शाखेचे कुलूप तोडून येथील मुकबधीर मुलांला मारहाण करून शाखेत प्रवेश करण्यासाठी सराईत गुन्हेगारांचा यामध्ये सहभाग होता. बोईसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुन्हेगारांचा मोरक्या मनोज संखे उर्फ बॉब, पंक्चर गॅसचा सराईत गुन्हेगार विजय प्रसाद उर्फ पंक्चर, संतोष सावंत व इतर ७ अज्ञात व्यक्तींन विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व त्यांच्या वर गंभीर गुन्हे दाखल असलेले इतरही आरोपींचा सहभाग होता. शाखेच्या दरोडा प्रकरणात दर्शन पाटील उर्फ पावडर, अजित मिश्रा, रोशन उर्फ लंगडा, संजीत मिश्रा उर्फ गोलू, अमोल मोरे यांचा समावेश असुन यातील काही आरोपी बोईसर पोलिस ठाण्याच्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. बोईसर भागात गुंडगिरी करण्यासाठी आता टोळ्या गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय झाल्या असताना देखील त्यांच्यावर कोणतीही प्रकारची ठोस कारवाई आजवर करण्यात आली नाही. मनोज संखे उर्फ बॉब यांच्या सर्व गुन्हेगारी कामकाजात सहभागी असलेला विजय प्रसाद उर्फ पंक्चर हा येथील गुन्हेगार व नशा करणाऱ्या मुलांना एकत्र करून टोळी कार्यरत करत असुन या आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
◾बाळासाहेबांची शिवसेना पक्षांचे पदाधिकारी निलम संखे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी बोईसर पोलिस ठाण्यात गेले त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या सोबत आरोपी मनोज संखे उर्फ बॉब व पोलीस ठाण्याच्या आवारात इतर सर्व आरोपी उपस्थित होते. बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी पोलिस ठाण्यातुन पळ काढला होता. महत्वाचे म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असताना चक्कं पोलिस ठाण्यात आरोपी उपस्थित असताना बोईसर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी आरोपींना ताब्यात ठेवणे गरजेचे होते. मात्र आरोपी फरार झाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी आरोपींना मोकळीक दिली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
◾ सहाय्यक पोलिस निरीक्षकांचे खबरी सराईत गुन्हेगार
बोईसर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे दाखल असलेले गुन्हे व बुधवारी शाखेच्या दरोडा प्रकरणात दाखल असलेला गुन्हा या मध्ये आरोपी असलेला विजय प्रसाद उर्फ पंक्चर हा सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांचा खबरी आहे. या मुख्य सुत्रधार असलेल्या आरोपीला अनेक प्रकरणांत याच अधिकाऱ्यांने पाठीशी घातले असल्याचा आरोप पिडीतांनी अनेकदा केला होता.