◾ साहेबांचा पीए सांगुन ठाण्याहून थेट बोईसर मध्ये लक्ष; लाखोची फसवणूक करणाऱ्या महाठगाला पिएचे पाठबळ?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: लोकसेवेसाठी सत्तेत आल्याचे वारंवार सांगितले जाणाऱ्या शिंदे सरकारचा कार्यकाळ काही दिवसातच वादग्रस्त ठरू लागला आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर भाजप सोबत शिंदे गटाने सरकार स्थापन करून हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री वारंवार बोलत आले आहेत. तर दुसरीकडे त्यांचे कथित पीए मात्र मोकाट सुटले आहेत. मुख्यमंत्री यांच्या नकळत कथित पीए यांनी प्रशासनाला आपल्या सोईसाठी धारेवर घेतले असुन असाच एक धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील बोईसर मध्ये घडल्याचे समोर आले आहे. साहेबांचा पीए असल्याचे भासवून त्या महाशयांनी थेट आता तारापूर औद्योगिक क्षेत्रात आपले लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता बदलाची घटना सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिले असून जनतेच्या हितासाठी हा बदल गरजेचा असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात वारंवार सांगितले आहे. याच स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना
सबंध महाराष्ट्र मधुन मिळत असलेले पाठबळ हे वाखडण्याजोगी आहे. परंतु आता मुख्यमंत्री यांचा पीए असल्याची बतावणी करून लोंढे नावाचा इसम पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात आपले लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रात व येथील पोलिस ठाण्यात भेट देवुन छुपा आढावा घेतला होता. मुख्यमंत्री यांचा पीए असल्याची बतावणी केली जात असल्याने तसेच सदर इसम मुख्यमंत्री यांचा जवळचा असल्याने नागरिकांच्या मनात देखील संभ्रम निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या कथित पीए ने बोईसर मधील लाखोंची फसवणूक करणाऱ्या महाठगाला हाताशी घेऊन त्याला बोईसर पोलिस ठाण्यातील व औद्योगिक क्षेत्रातील प्रकरणात लक्ष देण्यासाठी पाठबळ दिल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावाने दबाव टाकून बोईसर सह पालघर जिल्ह्यात ढवळाढवळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेले उद्योग धंदे व येथील घडणाऱ्या घडामोडी याला मोठे महत्त्व प्राप्त झालं आहे. याठिकाणी आर्थिक स्थिती पाहता औद्योगिक क्षेत्राचा मोह सर्वांनाच होत असतो. मात्र आता थेट साहेबांचा पीए असल्याची बतावणी करून येथील उद्योजकांना व अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार काही दिवसांपासून वाढत चालले आहेत. बोईसर च्या रस्त्यावर टवाळकी करणाऱ्या एका महाठगाला सोबत घेवून कथित पीए यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता बोईसर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांची देखील भेट घेतली. यावेळी महाठगाला सोबत घेवून हा मुलगा माझी सर्व काम याठिकाणी पाहणार असून तुम्ही त्याला सर्वतोपरी सहकार्य करायला हवं असा इशाराच पोलिसांना दिला. यामुळे साहेबांचा पीए असल्याने पोलिसांनी देखील याबाबत होकार दर्शविला होता. महत्वाचे म्हणजे अशाप्रकारे आजवर कोणत्याही साध्या मंत्र्यांचा पीए पोलिस ठाण्यात जावुन कोणाला ढवळाढवळ करत नसेल मात्र याठिकाणी थेट मुख्यमंत्री यांचा कथित पीए असल्याची बतावणी केली जात असल्याने मुख्यमंत्री यांचे नेमके पीए कोण आणि कोणते याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सर्वसामान्य नागरिकांना नाही. यामुळे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या कडे असलेल्या अधिकृत पीएची यादी जाहीर केल्या नंतर नेमका बोईसर मध्ये लोड देणारा कोण हे उघड होणार आहे.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. याठिकाणी प्रदुषणाचा विषय मोठा सोनेरी धुर काढणारा असल्याने याठिकाणी रोजच पोलिसांचे हात देखील प्रदुषणामुळे ओले होतात. याभागात अवैध भंगार व चोरटे धंदे देखील जोमाने सुरू असल्याने याठिकाणी लक्ष दिल्यास मोठा लाभ होणार असल्याची खात्री कथित पीए ला झाली आहे का असा सवाल उपस्थित राहत आहे.