◾ दोन गंभीर तर चार किरकोळ जखमी
रमेश पाटील
वाडा: जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढतांना मातीचा धस (ढिगारा) कोसळुन दोन जणांचा ढिगाऱ्याखाली दाबून मृत्यू झाला तर इतर दोन जणांना गंभीर दुखापत व चार जणांना किरकोळ दुखापत झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. मृतांमध्ये एक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.
पावसाळा जवळ आल्यामुळे घरांच्या कुडांना लेप करण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव गावाशेजारील डोंगरावर माती घेण्यासाठी कुटुंबातील नातेवाईक मिळून एकूण आठ व्यक्ती गेले होते, या आठमध्ये सात महिलांचा समावेश होता. हे सर्वजन रस्त्यालगत असलेल्या डोंगरातील माती खोदकाम करीत होते, यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा धस (ढिगारा) कोसळला. आणि खोदकाम करीत असलेल्या या कामगारांच्या अंगावर येऊन पडला. या डोंगराच्या एकदम जवळ असलेले मनोज यशवंत जाधव (30 वर्ष) व मुक्ता सुदाम तराळ (16 वर्ष ). हे दोन ढिगाऱ्यात गाढले गेले. या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात मोठ मोठे दगड असल्याने या दोघांचाही मातीखाली दाबून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर दुखापत झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.