◾हेमेंद्र पाटील
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात बंद असलेल्या कारखान्यांन मुळे भंगार माफियांना अच्छे दिन आले असुन स्थानिक पोलीस या माफियांना पाठीशी घालत असल्याचे आजवर दिसून आले आहे. विशेष म्हणजे बोईसर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे युनिट असताना बोईसर मधील भंगार माफियांना मोकळीक का असा सवाल उपस्थित होतो. काही दिवसांपूर्वी औद्योगिक क्षेत्रातील एका बंद कारखान्यात भंगार चोरी करताना झालेल्या स्फोटानंतर पुन्हा एकदा भंगार माफियांचा विषय प्रकाशझोतात आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या बोईसर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या कार्यकाळात फोफावलेला भंगार माफियांचा चोरटा कारोबार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या देखरेखीखाली जोमाने सुरू होता. पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखाचे अधिकारी देखील या माफियांच्या थेट संपर्कात आहेत. कारखान्यात होणारे भंगार चोरी बाबत अनेक तक्रारी समोर आल्या असल्या तरी मागील एक दिड वर्षात एकही ठोस कारवाई झालेली नाही. निवडणूक काळात एका राजकीय हाणामारीच्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांची तडकाफडकी बदली मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका फोन वर झाली होती. यामुळे पोलिस निरिक्षकांचा मुखवटा उतरला होता. मात्र याच पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आजही त्याठिकाणी ठाण मांडून बसले असल्याने भंगार माफियांचा चोरटा कारोबार आजही तसाच सुरू असल्याचे दिसून आले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्लॉट क्र.एन २२ वरील औरा ऑइल हा कारखाना मागील सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या कारखान्यात भंगार चोरी वर्षभरापासून सुरू होती. याबाबत अनेक वेळा तक्रारी देखील झाल्या होत्या मात्र “वेट अँड वॉच” हा फिल्मी डायलॉग मारणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक कदम यांनी सोईस्कर पणे भंगार माफियांना मोकळीक दिली असल्याचे उघडकीस आले आहे. भंगार माफियांचा आधार घेवून पोलिस ठाण्याला सुशोभीकरण मागील अनेक वर्षांपासून केले गेले आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे पोलिस अधिकारी भंगार माफियांचा विषय हाती आल्यावर मात्र त्यांना कोणताही त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष देवुन असतात. शासकीय पगारावर पंचतारांकित सोईसुविधा भागत नसल्याने बोईसर चे प्रदुषित वातावरण सहन करण्याची तयारी देखील अधिकाऱ्यांची पाहावयास मिळते. औरा ऑइल या कारखान्यात कारखान्यातील भंगार चोरीच्या उद्देशाने आत शिरलेल्या चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने भंगार कापत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे कारखान्याला आग लागून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तर स्फोट होताच बाकीचे चोर आणि जेसीबी चालकाने जेसीबीसह पळ काढला होता. मात्र मुख्य भंगार माफियांवर पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केलेली नाही
औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या सरकारी जागेवर वसलेल्या अवधनगर याभागात मोठ्या प्रमाणात भंगार माफियांचे मोठमोठे गोदामे आहेत. भंगार गल्लीत चोरी करण्यात आलेले किमती वस्तू आणल्या जातात. त्यामध्ये लोखंड, मशिनचे पार्ट, केबल, कारखान्यातुन चोरून आणलेले तांबे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यानंतर चोरी केलेले लोखंड बहुतांश वाडा भागात असलेल्या लोखंड बनविणाऱ्या कारखान्यात रात्रीच्या वेळी पाठवले जाते. यावेळी चोरीच्या मालाला देखील जिएसटी बिल बनवुन पाठवले जाते. पोलिसांच्या मदतीने आजवर हा चोरीचा माल बेटेगाव तपासणी नाक्यावरून हिरवा कंदील दाखवला जात होता. अवधनगर भागातील बाबु भंगार वाला, खलगुल्ला, सिद्दीकी, वाहब व अनेक चोरीच्या भंगार घटनेत सराईत असलेला सद्दाम नावाचा माफिया पोलिसांच्या मदतीने आजवर अनेक प्रकरणांतून निसटून गेला आहे. सद्दाम नावाचा माफिया औद्योगिक क्षेत्रातील बंद कारखान्यात रात्रीच्या वेळी भंगार चोरी करण्यासाठी अग्रेसर असून वाडा येथील एका मोठ्या कारखान्याच्या चोरी प्रकरणात देखील त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने देखील त्याला मोकळीक दिल्याने माफिया मोकाट फिरत आहे.