◾आठ कोटींच्या नकली नोटा सह पालघरचे दोघ ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात
◾पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये सुरू होता पैसे छापण्याचा छापखाना
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: कोट्यवधी रुपयांच्या भारतीय चलनातील बनावट नोटा छापणाऱ्या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बनावट नोटांचे प्रकरणं उघडकीस आले आहे. काही महिन्यांपूर्वीच बाजारात दोन हजाराच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. याबाबत अहवाल देखील रिझर्व्ह बँकेने जाहीर केला होता. मात्र पालघर जिल्ह्यातील दोघांनी दोन हजार रुपयाच्या नोटा छापून बाजारात त्यांची विक्री सुरू केली होती. परंतु ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महत्वाचे म्हणजे यातील एक आरोपीला अघोरी कृत्य करून पैशाचा पाऊस पाडण्याचा नाद लागला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
ठाणे शहराच्या हद्दीत शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी भागात दोन इसम इनोव्हा कारमधुन बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखाच्या युनिट – ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने टिम बनवून गायमुख चौपाटी भागात सापळा लावून राम हरी शर्मा वय ५२ राहणार बोळींज विरार व राजेद्र रघुनाथ राउत वय ५८ राहणार परनाळी नाका, शिवप्रभा हॉटेल समोर कुरगाव यांना ताब्यात घेतले. यावेळी इनोव्हा गाडीची तपासणी केली असता गाडीत दोन हजार रुपयाच्या भारतीय चलनातील वेगवेगळ्या नंबरचे ४०० बंडल असे आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. आरोपींचे विरुद्ध सहा. पो. निरी. अविनाश रामदास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ३७३ / २०२२ भा.द.वि. कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ३४ अन्वय दिनांक ११/११/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या चौकशीत ताब्यात घेतलेल्या आरोपींनी या बनावट नोटा मदन चौव्हाण यांच्या मदतीने पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाळयामध्ये संगणक व प्रिन्टरच्या सहाय्याने छापल्या असुन हा गाळा ताब्यात घेतलेला आरोपी राम हरी शर्मा यांचा असुन गुन्हयांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर, नेमणुक गुन्हे , युनिट – ५, हे करीत असल्याची माहिती प्रसिद्ध पत्राद्वारे ठाणे पोलिसांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे गेल्या एक दिड वर्षांपासून हा छापखाना सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असुन यामाघे मुख्य सुत्रधार आणखी कोण आहे याबाबत पोलिसांचा तपास महत्वाचा ठरणार आहे.
◾कोण आहे राजेंद्र राऊत
पालघर तालुक्यातील कुरगाव येथे राहणारा राजेंद्र राऊत याला गेल्या अनेक वर्षांपासून पैशाचा पाऊस पाडण्याची लत लागली होती. अघोरी कृत्य करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन हा आपल्या बोईसर व पालघर मधील ग्रुप सोबत ही कामे करत असल्याची खात्रीशीर माहिती पालघर दर्पण कडे प्राप्त झाली आहे. याच इतरांना कडून व्याजाने पैसे घेवून नंतर त्याला त्यापेक्षा अधिक पैसे देण्याचे काम देखील हा इसम करत होतो. सतत पैशाच्या मागे धावणारा आणि गैरमार्गाने पैसे मिळतील यासाठी अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू बाबांचे त्यांच्या सोबत जवळचे संबंध असल्याची माहिती काही लोकांना कडून प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून राजेंद्र राऊत हा आपल्या राहत्या घरी आलेला नव्हता.