रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम
◾बोईसरच्या भवानी चौक भागात सरकारी जागेवर बांधकाम सुरू
◾शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून दोन गुंठे जागा केली होती नावावर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: अनधिकृत बांधकामांचे केंद्र असलेल्या बोईसर तलाठी सजा हद्दीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने सरकारी जागेवर बांधकाम सुरू आहे. येथील काटकर पाडा भवानी चौक येथे एकांने चक्क सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू केले असल्याचे दिसून येते. यातच काही वर्षांपूर्वी अधिकार्यांना हाताशी धरून सरकारी जागा रहिवासी वापरासाठी नावावर केलेल्यांनी आता त्याजागेचा वाणिज्य वापरासाठी बांधकाम सुरू केले असताना देखील महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.
बोईसर काटकर पाडा येथील भवानी चौक हद्दीत असलेली काही जागा रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी संपादन केली जाणार असल्याने आता याठिकाणी अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू झाली आहेत. रेल्वे कडून मिळणारा भरीव मोबदला आपल्या खात्यात यावा यासाठी चक्क सरकारी जागेवर बांधकाम सुरू केले आहे. काटकर पाडा भवानी चौक भागात नवीन सर्वे नंबर स. न १२२/१/अ व जुना स.न. १७६/1 यातील जागा मालक सुरेश बळवंत पाटील यांच्या कब्जात असलेली जागा साधारण सन १९९७ साली २०० चौरस मीटर जागा शासनाच्या अटीशर्तीने स्वतः च्या नावाने सातबारा करून घेतला होता. राहते घर दाखवून जागेचा ताबा घेतला असला तरी त्यानंतर या जागेवर वाणिज्य वापरासाठी गाळे बनविण्यात आले होते. मात्र आता शासनाने दिलेल्या जागेच्या पुढे असलेल्या सरकारी जागेवर मुख्य रस्त्यालगत पक्के आरसीसी वाढीव बांधकाम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. मात्र या बांधकामांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष बोईसर महसूल विभागाने दिलेले नाही.
मुख्य रस्त्यालगत महिनाभर पासून अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू असताना देखील बोईसर तलाठी यांनी लक्ष कसे दिले नाही हा सवाल उपस्थित राहत आहे. विशेष म्हणजे एखाद्या कान्याकोपऱ्यात बांधकामावर कारवाईची तत्परता दाखविणारे महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी मात्र अनधिकृत बांधकामांकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. महिन्याभरातच इमारत उभी करण्याचा मनसुबा येथील लोकांचा असल्याने अशा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महत्वाचे म्हणजे रहिवाशी वापर दाखवून नावावर केलेली शासकीय जागा अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुन्हा सरकार जमा करणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या सरकारी जागेवर याभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असताना देखील महसूल खाते नेमके करते काय याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. काटकर पाडा येथील सरकारी जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकाम बाबत मंडळ अधिकारी मनिष वर्तक यांना विचारणा केली असता तातडीने कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.