पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वत्रच टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्रच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. वाडा तालुक्यातील मौजे गारगांव येथील एका रेशनिंग दुकानदाराने धान्य देण्यासाठी दहा फुट लांबीचा पाईप उपयोगात आणला आहे.
करोनाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षितता म्हणुन गेल्या १७ दिवसांपासून पासुन टाळेबंदी सुरू आहे. या टाळेबंदीत आवश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे हातावर पोट असलेल्या अनेक गरिब कुटुंबियांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल सुरू झाले आहेत. या गरिब कुटुंबियांना शासनाने स्वस्त धान्य दुकानांमधुन धान्य पुरवठा सुरू केला आहे.
तालुक्यातील मौजे गारगांव येथील स्वस्त धान्य दुकानदार प्रशांत रोठे यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या दुकानात धान्य वजन केल्यानंतर हे धान्य एका पाईपाच्या माध्यमातून दहा फुट अंतरावर उभ्या असलेल्या ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. गारगांव येथे रेशनचे धान्य घेणारे 296 लाभार्थी असुन या सुविधेचे सर्व लाभार्थ्यांनी स्वागत केले आहे. तसेच येथील ग्रामस्थांनी प्रशांत रोठे यांचे याबाबत कौतुक केले आहे.