◾ आदिवासींच्या कब्जे वहिवाटित असलेली जागा कायदेशीर मार्गाने मोकळी करून देण्यासाठी झाली मोठी तडजोड
◾ सातबारा मध्ये लागलेल्या कुळाचा वेगळा तयार केला सातबारा; बनावट कागदपत्रे प्रकरणी गुन्हेगार असलेला विलास नावाचा भुमाफियां करतोय जागेची तडजोड
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहराच्या पुर्वेकडे असलेल्या गावांचे जमिनीचे दर दुपटीने वाढत असल्याने आपल्या कडे देखील अशीच जागा असावी याचे स्वप्न येथील दोन शासकीय अधिकाऱ्यांना पडले आणि नदी काठच्या जागेवर आपली हद्द निश्चित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका जमिनदाराच्या मालकीची जागेची शासकीय अटीशर्ती व आदिवासी लोकांचे असलेले कुळ काढून देण्याबाबत मोठी तडजोड असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच बोईसर मधील सत्ता पक्षांचा एक नेता देखील आपल्या पदरात काही पडतेय का यासाठी नदीकाठी टक लावुन बघत असल्याचे समोर आले आहे.
बोईसर पुर्वेकडे असलेल्या गारगाव या गावात नदी लगत मोठ्या प्रमाणात मालकी व आदिवासी कब्जे वहिवाटित असलेल्या जागा आहेत. अतिशय निसर्गरम्य असलेल्या परिसरामुळे या जागेचा मोह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील पडला आहे. गारगाव येथील सर्वे नंबर 3/1,3/2 मधील 27 एकर जागेवर काही प्रमाणात स्थानिक आदिवासी लोकांचा कब्जा होता. तसेच बागायती असलेल्या जागे वरील शासकीय अति शर्ती काढण्यासाठी मोठी तडजोड करण्यात आली आहे. अनेक वर्षे शासकीय दरबारी सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जागे बाबत शेकडो वेळा हेलपाटे मारावे लागतात. मात्र याठिकाणी तहसील व प्रांत कार्यालयातील अधिकारी अतिशय वेगवान पध्दतीने जागेचे टायटल सुरळीत करण्यासाठी मदत केली. बोईसरच्या मंडळ अधिकारी कार्यालयातुन देखील तलाठ्यांनी वेगवान पणे कामकाज पाहिले. याचे कारण देखील तसेच होते याठिकाणी जागेचा मोह तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना पडला होता. अधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने ही जागा खरेदी करण्याचीही प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
बोईसर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू असताना याबाबत तक्रारी करूनही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही शासकीय कामकाजात व्यस्त असल्याने अनेकदा सांगुन दाखवले होते. याचे खरे कारण आता पुढे आले असुन पालघर दर्पण कडे आलेल्या खात्रीशीर माहिती नुसार बोईसर येथील एका काळ्या रंगाच्या कार मधुन तहसील व मंडळ अधिकारी गारगाव येथे विलास नावाच्या भुमाफियां बरोबर गेले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून जमिनदारांना फायदा होईल याठिकाणी केलेले कामाची चौकशी होणे आवश्यक आहे. बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. गारगाव ची जागा कशीही करून आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी संपुर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावली होती. कायद्याला बाजूला करून तहसीलदार व संपूर्ण टीमने मोठ्या हुशारीने कागदोपत्री जागेत बदल देखील केल्याचे दिसून आले आहे.
गारगाव येथील एका जमिनदारांच्या 27 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात स्थानिक आदिवासी लोकांचे कुळ लागले होते. व काही ठिकाणी आजही जागा इतरांच्या ताब्यात आहे. जागा मालकांने भुमाफियां विलास नावाच्या एकाला हाताशी घेवून जागा विक्री व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान हा विषय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांन कडे आल्यावर जागेचा मोह अधिकार्यांना आवरला नाही. त्यांनी सर्व कागदपत्रे पुर्ण करण्यासाठी काही प्रमाणात जागेची मागणी केली व त्यानंतर दलालांच्या मध्यस्थी नंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका सातबारा वरती असलेल्या कुळांचा वेगळा सातबारा तयार केला. यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार 6 एकर जागा कागदोपत्री टायटल सुरळीत केल्याचे समोर आले आहे. मुळात कोणत्याही सातबारा वरती जर कुळ लागले असेल तर त्या सातबारा मध्ये फोड करून ज्यांचे कुळ लागले आहे, त्यांचा वेगळा सातबारा करता येत नसताना देखील जागेच्या मोहा मुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे तहसीलदार यांनी याबाबत बोईसर मंडळ अधिकारी यांना दिले आहेत. यामुळे या संपूर्ण प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.