◾ साडेचार लाख रोकड व सोन्याचे दागिने हिसकावून सात दरोडेखोर फरार; सशस्त्र दरोडेखोराची टोळी शोधण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतानाच बोईसर शहरात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लुटून दरोडेखोर पसार झाले आहेत. घटना घडल्यानंतर साधारण अर्धातास नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याअगोदर दरोडेखोर रेल्वे स्टेशन भागातुन निघून गेले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पालघरचे पोलिस अधीक्षक यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असुन दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम रवाना झाल्या आहेत.
बोईसर ओस्तवाल मधील राजु राठोड व सुरेंद्र राठोड यांच्या कंपनीचे कार्यालय असुन याठिकाणी शुक्रवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी दरोडा पडला. बंदुकीचा धाक दाखवून कार्यालयात प्रवेश केलेल्या पाच दरोडेखोरांनी कार्यालयात एक महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी यांचे हात बांधुन ठेवले व तोंडावर चिकनपट्टी लावली. यानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कार्यालयात असलेली ४ लाख ५० हजार रूपयांची रोड आपल्या ताब्यात घेतली. याच वेळी याठिकाणी नेहमी प्रमाणे चहा देण्यासाठी माधव टी हाऊस चा मालक चहा घेवून कार्यालयात प्रवेश करताच त्याला देखील मध्ये पकडून दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून चहा वाल्यांचे हात व पाय बांधून त्यांच्या तोंडावर चिकनपट्टी लावली. याच दरम्यान चहा वाल्यांच्या हातातील असलेली सोन्याची अंगठी देखील दरोडेखोरांनी हिसकावून घेतली. यावेळी दरोडेखोरांच्या हातात दोन बंदुकी सोबतच लोखंडी हत्यार देखील होते. यानंतर बंदुकीचा धाक दाखवून पुन्हा दरोडेखोरांनी बांधून ठेवलेल्या लोकांना जिवेठार मारू असा दम देत कार्यालयातुन पसार झाले. दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश केला त्यावेळी दोन त्यांचे साथीदार हे कार्यालया बाहेर पहारा देत असल्याचे समोर आले असुन मालक सुरेंद्र राठोड यांच्या कडून देखील दुजोरा देण्यात आला आहे.
दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर कार्यालयात बांधून ठेवलेल्या एका कर्मचाऱ्याने मोठ्या जिकरीने आपले हात सोडवून घेतले. व लागलीच मालकांना फोन केला. याबाबत बोईसर पोलिसांनी माहिती दिल्यानंतर साधारण अर्धातासा नंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र दरोडेखोर चालत मधुर हॉटेल परिसरात ओस्तवाल गेट जवळून रिक्षात बसून नवापूर रोड मार्गे रेल्वे स्टेशन भागात गेले. याठिकाणाहुन सर्व दरोडेखोर पसार झाले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्या प्रमाणे एकुण सात दरोडेखोरांची टोळी याभागात उपस्थित असल्याचे समोर आले आहे. राठोड यांच्या कार्यालयात शिरकाव केलेल्या दरोडेखोरांन मध्ये एक उंचीने लहान सावळ्या रंगाचा असलेला माणूस होता व टिशर्ट व जिन्स पॅन्ट व बुट घातलेल्या दरोडेखोरांन कडे खाकेत घेणारी बॅग देखील सर्वांना कडे होत्या. तसेच सर्वांनी तोंडावर मास्क लावले होते. विशेष म्हणजे राठोड यांच्या कार्यालयात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद अवस्थेत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत बोईसर पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण सात टीम दरोडेखोरांचा तपास घेण्यासाठी वेगवेगळ्या भागात गेल्या आहेत.